लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : अर्थव्यवस्थेला वेगवान गती मिळण्याच्या आशेने आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीची सकारात्मक सुरुवात झाली आहे. मुख्यतः ग्रामीण भागातून मागणी आणि उपभोगांत वाढ आश्वासक असली तरी विशेषत: खाद्यान्न महागाईची चढती कमान चिंतेची बाब आहे, असे रिझर्व्ह बँकेने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या मासिक पत्रिकेत म्हटले आहे.
जुलै महिन्यासाठी प्रसिद्ध झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या पत्रिकेतील ‘स्टेट ऑफ इकॉनॉमी’ शीर्षकाखालील लेखांत, जून तिमाहीतील दमदार कामगिरी आणि त्या जोडीला जुलैपासून सुरू झालेल्या दुसऱ्या तिमाहीतील सकारात्मक वातावरणामुळे अर्थव्यवस्था गतिमान राहण्याचे संकेत आशादायी असल्याचे म्हटले आहे. शेतीसह ग्रामीण भागातून वाढलेला खर्च हे मागणीत वाढीसाठी मुख्यत्वे चालना देणारी बाब ठरली आहे, असेही त्यात म्हटले आहे.
हेही वाचा >>>‘बैजूज’च्या संस्थापकांची १७,५४५ कोटींची संपत्ती शून्यावर कशी आली? स्वत:च्या कंपनीतला अधिकार का गमावला?
खाद्यान्न किंमतवाढ शोचनीय
अर्थव्यवस्था वेगाने मार्गक्रमण करत असली तरीही, अन्नधान्य आणि खाद्यान्नांमधील वाढती महागाई चिंतेची बाब बनली आहे. सलग तीन महिन्यांच्या नियंत्रणानंतर, भाज्यांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. जून २०२४ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर पुन्हा ५ टक्क्यांपुढे पोहोचला आहे. यामुळे मध्यवर्ती बँकेचे पतविषयक धोरण आणि पुरवठा व्यवस्थापनाच्या संयोजनाद्वारे खाद्यान्न आणि इंधनेतर घटकांची महागाई ओसरली असतानाही तिचे प्रतिबिंब हे किरकोळ महागाई दर आणि कुटुंबाला भेडसावणाऱ्या महागाईच्या झळा अपेक्षेप्रमाणे कमी करणाऱ्या परिणामांमध्ये दिसून येत नाही.
खाद्यान्न किमतीच्या भडक्याचे धक्के हे क्षणिक आहेत, असा युक्तिवाद केला जातो. परंतु, या क्षणिक धक्क्यांचे घाव वर्षभरापासून सुरू आहेत आणि हा एक खूप मोठा कालावधी ठरतो. भाज्यांच्या विस्तृत श्रेणीतील निरंतर महागाई हे या काळाचे टिकाऊ वैशिष्ट्य बनणे चिंतेच आहे.- मायकेल देबब्रत पात्रा, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर
अर्थव्यवस्थेत ‘डिसफ्लेशन’ची परिस्थिती आहे. अन्नाच्या किमतीतील महागाईचे झटके हे तात्पुरते आहेत, असा युक्तिवाद केला जात होता. मात्र बऱ्याच कालावधीपासून अन्नाच्या किमतीतील महागाई वाढती राहिलेली आहे.