करोना महामारीचा जगभरातील कार्यसंस्कृतीवर मोठा परिणाम झाला आहे. कोविड १९ च्या महामारीनंतर घरून काम करण्याची संस्कृती सर्वत्र विकसित झाली. त्याचा परिणाम अजूनही दिसून येत आहे. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यासाठी धडपडत आहेत. असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका कर्मचाऱ्याने एका नामांकित कंपनीत चांगली नोकरी सोडलीच नाही, तर घरून काम केल्यानेसुद्धा करोडोंचे नुकसान करून घेतले आहे.
आठवड्यातून तीन दिवस ऑफिसला जावं लागायचं
हे प्रकरण अमेरिकेतील असून, प्रसिद्ध ई-रिटेल कंपनी अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्याशी संबंधित आहे. नवीन वर्क पॉलिसी अंतर्गत Amazon ने कर्मचार्यांना आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात येण्यास सांगितले, अशा परिस्थितीत कर्मचार्याने घरून काम करण्यासाठी कंपनीकडून मिळणारे करोडो रुपयांचे फायदे नाकारण्यास प्राधान्य दिले. आता संबंधित कर्मचारी त्याच्या अटींनुसार दुसऱ्या कंपनीत रुजू झाला आहे आणि घरून काम करीत आहे.
या अटीवर नोकरीला सुरुवात केली
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, अॅमेझॉनच्या या कर्मचाऱ्याने एका अटीवर नोकरी सुरू केली होती की, त्याला घरून काम करण्याची सुविधा मिळावी. यासाठी त्यांनी दुर्गम भागात घर घेतले होते. या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे की, त्याचे कुटुंब आणि पाळीव प्राण्यांबरोबर दुर्गम भागात राहणे हे त्याचे नेहमीच स्वप्न होते.
जेव्हा निभाव लागला नाही तेव्हा राजीनामा दिला
मात्र, आता कंपनीने त्याला कार्यालयात येण्यास सांगण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा कर्मचाऱ्याने असमर्थता व्यक्त केली. जेव्हा काहीही निभाव लागत नाही, असे समजल्यानंतर त्याने कंपनीला सांगितले की, ऑफिस शहरात स्थलांतरित करण्यासाठी त्याला १.५ लाख डॉलर्सपर्यंत खर्च होऊ शकतो. त्यासाठी त्याने कंपनीकडे रिलोकेशन पॅकेजची मागणी केली. कंपनीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा दिला.
इतक्या कोटींचे नुकसान
कर्मचाऱ्याने सांगितले की, अॅमेझॉनची नोकरी सोडल्यानंतर तो आता दुसऱ्या कंपनीत काम करीत आहे. अॅमेझॉनमध्ये त्याला आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात येण्यास सांगितले जात होते. नवीन कंपनीत त्याला घरून काम करण्याची सुविधा मिळाली आहे. पगारही जवळपास जुनाच आहे. नवीन कंपनी छोटी आहे, त्यामुळे त्याला Amazon सारख्या स्टॉक ऑप्शन्ससारखे फायदे मिळत नाहीत. Amazon मध्ये त्या कर्मचाऱ्याला २.०३ लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे १.६० कोटी रुपयांचे स्टॉक पर्याय मिळाले होते. मात्र, राजीनाम्यामुळे कर्मचाऱ्याला अॅमेझॉनच्या स्टॉक ऑप्शनचे फायदे गमवावे लागले.
…तर कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार- ग्लासर
अॅमेझॉनचे प्रवक्ते ब्रॅड ग्लासर यांनी इनसाइडरला ईमेलद्वारे सांगितले की, ते कर्मचाऱ्यांच्या या माहितीची खातरजमा करू शकत नाहीत. आम्ही वारंवार आमची भूमिका स्पष्ट केली आहे. फेब्रुवारीमध्ये आम्ही कर्मचार्यांना सांगितले होते की, त्यांना मे महिन्यापासून दर आठवड्याला तीन किंवा अधिक दिवस कार्यालयात येण्यास सांगणार आहोत, कारण आम्हाला विश्वास आहे की ते कार्यालयात येऊन सर्वोत्तम उत्पन्न देतील. आमच्या ग्राहकांसाठी, व्यवसायासाठी आणि संस्कृतीसाठी आता कर्मचाऱ्यांनी ऑफिसला येणे आवश्यक आहे. टाइमलाइन या अनेक घटकांच्या आधारे बदलू शकतात आणि आम्ही कर्मचार्यांशी वैयक्तिकरित्या संवाद साधत आहोत. आमच्या पॉलिसीप्रमाणेच कर्मचाऱ्यांना वागणे अपेक्षित आहे अन्यथा तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असंही ग्लासर म्हणालेत.