पुणे : ई-कॉमर्स क्षेत्रातील ॲमेझॉन इंडियाने लघू व मध्यम उद्योग क्षेत्रातील विक्रेत्यांसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात मोठी कपात केली आहे. यामुळे दिवाळीच्या काळात विक्रेत्यांच्या संख्येत, पर्यायाने विक्रीत वाढीचा अंदाज असून, या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातील १ लाख ८० हजार विक्रेत्यांना होणार आहे.
याबाबत ॲमेझॉनचे विक्री भागीदार सेवा विभागाचे संचालक अमित नंदा म्हणाले की, दिवाळीचा काळ हा आमच्यासोबत विक्रेत्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. या कालावधीत उत्पादनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या शुल्कात ३ ते १२ टक्के कपात करण्यात आली आहे. ही कपात किराणा, फॅशन आणि इलेक्ट्रॉनिक्स यासह इतर प्रकारच्या उत्पादनांच्या प्रकारात करण्यात आली आहे. शुल्क कपात दिवाळीच्या एक महिना आधीपासूनच केल्यामुळे विक्रेत्यांना त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा मिळू शकेल.
हेही वाचा >>> महाबँकेला राजभाषेचा सर्वोच्च ‘कीर्ती पुरस्कार’
ॲमेझॉनकडून कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि मशीन लर्निंग या तंत्रज्ञानाचा फायदा विक्रेत्यांना होत आहे. या तंत्रज्ञानामुळे विक्रेत्यांना ॲमेझॉनवर नोंदणी करणे, उत्पादने सूचिबद्ध करणे आणि त्यांची जाहिरात करणे या बाबी सहजसोप्या बनल्या आहेत. एखाद्या उत्पादनाबाबत अगदी मूलभूत माहिती दिली तरी ‘एआय’च्या मदतीने उत्पादनाचे अतिशय चांगले सविस्तर तपशिलासह सादरीकरण शक्य होत आहे. याचबरोबर ग्राहकांसाठी रूफस हा कृत्रिम प्रज्ञा मंच सुरू केला असून, त्यावर त्यांना खरेदीचा अतिशय वेगळा अनुभव मिळत आहे, असे नंदा यांनी सांगितले.
देशभरात ॲमेझॉनवर १६ लाख विक्रेते असून, त्यातील १ लाख ८० हजार महाराष्ट्रातील आहेत. पुण्यातील विक्रेत्यांची संख्याही मोठी असून, त्यांच्याकडून गृहोपयोगी उत्पादने, स्वयंपाकाची उपकरणे, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री अधिक प्रमाणात होत आहे. – अमित नंदा, संचालक, विक्री भागीदार सेवा, ॲमेझॉन इंडिया