नवी दिल्ली : देशात वाहतुकीवर होणारा खर्च सध्या १६ टक्के असून तो पुढील दोन वर्षात निम्म्याने कमी करून, ९ टक्क्यांवर आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत, अशी घोषणा केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथे केली. ई-कॉमर्स मंच ॲमेझॉनच्या वतीने ‘संभव २०२४’चे आयोजन करण्यात आले. गडकरी यांच्या बीजभाषणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ते म्हणाले की, चीनमध्ये वाहतूक खर्च ८ टक्के आहे, तर अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये तो १२ टक्के आहे. माझ्या मंत्रालयाने देशातील वाहतुकीचा खर्च कमी करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. आम्ही अनेक महामार्ग तयार करत आहोत, त्यामुळे वाहतूक खर्च कमी होईल. देशात वाहतुकीचा खर्च पुढील दोन वर्षात १६ टक्क्यांवरून ९ टक्क्यांवर आणला जाईल. सध्या दिल्ली ते डेहराडून प्रवासास ९ तास लागतात, परंतु जानेवारीपर्यंत दिल्ली ते डेहराडून प्रवास फक्त २ तासांत होईल. याचबरोबर दिल्ली ते जयपूर प्रवास २ तासांत, दिल्ली ते मुंबई १२ तासांत आणि चेन्नई ते बंगळुरू २ तासांत होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. आपण वर्षाला २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो. या इंधनापासून मोठ्या प्रदूषण होते. यामुळे पर्यायी इंधनाच्या दिशेनेही पावले टाकली जात आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया करून आपण हरित हायड्रोजन मिळवू शकतो. कचऱ्यातील प्लास्टिक, धातू, काच यासारख्या घटकांवर प्रक्रिया करून हे आपण साध्य करू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून

ॲमेझॉनकडून एक हजार कोटींचे पाठबळ

लघुउद्योगांना प्रोत्साहन, पाठबळ आणि त्यांच्या सबलीकरणासाठी ॲमेझॉनकडून ‘संभव २०२४’ चे आयोजन करण्यात येते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या सरकारच्या प्राधान्यक्रमाला गती देण्यासाठी ॲमेझॉनने औद्योगिक व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाशी (डीपीआयआयटी) सामंजस्य करार मंगळवारी केला. या अंतर्गत ॲमेझॉनकडून भारतातील ग्राहक वस्तू उत्पादन क्षेत्राचे डिजिटायझेशन करणाऱ्या आणि देशांतर्गत तसेच जागतिक मागणी पूर्ण करणाऱ्या ‘स्टार्टअप्स’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी १२ कोटी डॉलर (सुमारे एक हजार कोटी रुपये) राखून ठेवलेला ‘संभव व्हेंचर फंड’ सुरू केला आहे. यामुळे हजारो रोजगार निर्माण होतील.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon smbhav 2024 nitin gadkari on transport cost to be minimized print eco news css