अयोध्येतील राम मंदिरात आज भगवान रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला हजेरी लावली. अंबानी कुटुंबाने आज रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक प्रसंगी श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला २.५१ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. श्रीरामजन्मभूमी मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुकेश अंबानी त्यांच्या पत्नी नीता अंबानी आणि मुलांसह उपस्थित होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, ‘भगवान रामाचे आज आगमन होत आहे, २२ जानेवारी ही संपूर्ण देशासाठी राम दिवाळी असेल.
रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानीही पत्नी श्लोका मेहताबरोबर राम मंदिरात उपस्थित होते. हा दिवस इतिहासाच्या पानात लिहिला जाईल, आम्हाला इथे आल्याचा आनंद होत असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात अनंत अंबानीही दिसले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटही उपस्थित होते. ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा साजरा करण्यासाठी अंबानी कुटुंब अयोध्येतील श्रीराम मंदिरात एकत्र पोहोचले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज ही २२ जानेवारीला सुट्टी म्हणून घोषित करणाऱ्या पहिल्या खासगी संस्थांपैकी एक होती. जेणेकरून लाखो कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आनंदोत्सव साजरा करू शकतील आणि रामलल्लाच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याला उपस्थित राहू शकतील.
हेही वाचाः राम मंदिरासंदर्भातील अमूलचे डूडल व्हायरल, १ लाखांहून अधिक लाइक्स अन् कमेंट्स
या महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान लोकांना जोडण्यासाठी जिओचे ट्रू 4जी आणि स्टँडअलोन 5जी नेटवर्कदेखील अयोध्येत जिओमध्ये अपग्रेड करण्यात आले. चांगल्या आणि अखंड नेटवर्कसाठी संपूर्ण शहरात अतिरिक्त टॉवरदेखील स्थापित केले आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी ‘मे आय हेल्प यू’ डेस्क उभारण्यासाठीही मदत देण्यात आली. जिओने दूरदर्शनच्या सहकार्याने देशभरातील लाखो प्रेक्षकांसाठी ऐतिहासिक राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विशेष थेट प्रक्षेपण केले.