Mukesh Ambani becomes India richest man : भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण याबाबत गेल्या दीड वर्षात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. भारतातील दोन अव्वल श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदाणी यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी चुरशीची स्पर्धा सुरू आहे. अलीकडेच गौतम अदाणी भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यात यशस्वी झाले होते, परंतु काही दिवसांतच मुकेश अंबानींनी त्यांना मागे टाकत पुन्हा वरचा नंबर मिळवला आहे.

मुकेश अंबानी यांची सध्याची संपत्ती किती?

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सध्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. सोमवार ८ जानेवारी रोजी सकाळी मुकेश अंबानी यांची निर्देशांकावरील एकूण संपत्ती ९७.५ अब्ज डॉलर होती. गेल्या २४ तासांत अंबानींच्या संपत्तीत ५३६ दशलक्ष डॉलरने वाढ झाली आहे. यासह मुकेश अंबानी पुन्हा भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जागतिक स्तरावर ते सध्या १२व्या स्थानावर आहे.

हेही वाचाः विश्लेषण: २०२४ मधील बाजाराची स्थिती; गुंतवणूकदारांसाठी आणखी एक चांगले वर्ष?

गौतम अदाणी यांची संपत्ती खूप कमी झाली

अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांना गेल्या २४ तासात नुकसान सोसावे लागले आहे. या कालावधीत अदाणींच्या निव्वळ संपत्तीत ३.०९ अब्ज डॉलरची लक्षणीय घट झाली आहे. आता गौतम अदाणी यांची संपत्ती ९४.५ अब्ज डॉलरवर आली आहे. या संपत्तीसह अदाणी आता भारतातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आहे आणि जगभरात १४ व्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचाः देशभरात अंड्यांच्या किमती वाढण्याचं कारण काय?

फोर्ब्स रिअलटाइम यादी

फोर्ब्सच्या रिअलटाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, मुकेश अंबानी अजूनही गौतम अदाणींच्या पुढे आहेत. या यादीनुसार, मुकेश अंबानी यांची सध्याची संपत्ती १००.९ अब्ज डॉलर आहे आणि ते जगातील १२ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गौतम अदाणी ७८.२ अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १६ व्या स्थानावर आहेत.

अदाणी हे यशोशिखरावर पोहोचले होते

गौतम अदाणी यांनी २०२२ च्या शेवटच्या महिन्यांत अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या शानदार रॅलीच्या जोरावर प्रथमच मुकेश अंबानींना मागे टाकले होते. त्यांनी भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून २०२३ वर्षाची सुरुवात केली. त्यावेळी त्यांची संपत्ती १२० अब्ज डॉलर्सच्या वर गेली होती आणि ते जगातील टॉप ३ श्रीमंत लोकांमध्ये सामील झाले होते.

हिंडेनबर्ग संशोधन अहवालामुळे नुकसान झाले

त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये आलेल्या हिंडेनबर्ग संशोधन अहवालामुळे अदाणींचे मोठे नुकसान झाले. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदाणी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे गौतम अदाणी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप ३० मधून बाहेर पडले. गेल्या काही महिन्यांमध्ये अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी आली आहे, ज्यामुळे गौतम अदाणी यांची संपत्ती वाढण्यास मदत झाली आहे.