Pepperfry चे सह संस्थापक आणि CEO अंबरीश मूर्ती यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अंबरीश यांनी २०११ मध्ये आशिष शाह यांच्याबरोबर मुंबईत फर्निचर आणि होम डेकोर कंपनीची स्थापना केली. ते आयआयएम कोलकाताचे माजी विद्यार्थी होते. विशेष म्हणजे त्यांना ट्रेकिंगचीही आवड होती. पेपरफ्रायच्या आधी अंबरीश हे eBay वर कंट्री मॅनेजर होते. Pepperfry चे दुसरे सह संस्थापक आशिष शाह यांनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले की, ‘माझा मित्र, मार्गदर्शक, भाऊ अंबरीश मूर्ती यापुढे नाही हे सांगताना अतिशय दुःख होत आहे. काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने लेहमध्ये आम्ही त्यांना गमावले. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि त्याच्या कुटुंबाला आणि प्रियजनांना शक्ती द्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबरीश मूर्ती यांना ट्रेकिंगची प्रचंड आवड होती

अंबरिश मूर्ती यांना ट्रेकिंगची खूप आवड होती. सुट्टीसाठी त्यांचे आवडते ठिकाण लडाख होते. झंस्कर व्हॅलीच्या चादर ट्रेकमधील त्यांचा ट्रेकिंगचा अनुभव हा त्यांच्या सर्वोत्तम अनुभवांपैकी एक असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. २०१६ मध्ये त्यांचे लग्न झाले होते.

हेही वाचाः IT क्षेत्रालाही मंदीचा फटका; टीसीएस, इन्फोसिस, विप्रोमधील नोकऱ्या गायब?

१९९६ मध्ये IIM मधून MBA केले, त्यानंतर २०११ मध्ये स्वतःची कंपनी उघडली

अंबरीश यांनी १९९०-९४ मध्ये दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून सिव्हिल इंजिनीअरिंग केले. यानंतर त्यांनी १९९४-९६ मध्ये IIM कोलकाता येथून एमबीए पूर्ण केले. त्यानंतर ते कॅडबरी मॅनेजमेंटमध्ये ट्रेनी म्हणून रुजू झाले. कंपनीने त्यांना एरिया सेल्स मॅनेजर बनवून केरळला पाठवले. सुमारे ५ वर्षांनी २००१ मध्ये त्यांनी कॅडबरी कंपनी सोडली. त्यानंतर अंबरिश २ वर्षांसाठी ICICI प्रुडेन्शियल AMC मध्ये म्युच्युअल फंड उत्पादने लाँच करण्याचे काम पाहिले. २००३ मध्ये त्यांनी आर्थिक प्रशिक्षण उपक्रम, मूळ संसाधने सुरू करण्यासाठी नोकरी सोडली. त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही आणि २००५ मध्ये ब्रिटानियामध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केले. ७ महिन्यांच्या आत ते eBay India मध्ये गेले आणि दोन वर्षांत ते भारत, फिलिपिन्स आणि मलेशियाच्या या देशांत ईबे इंडियाचे प्रमुख झाले. भारतातील ई-कॉमर्स व्यवसाय झपाट्याने वाढणार आहे हे त्यांना माहीत होते, पण eBay ला भारतीय व्यवसायात गुंतवणूक करायची नव्हती, म्हणून त्यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचाः टेस्ला भारतात येण्याच्या तयारीत; एलॉन मस्क यांनी भारतीय वंशाच्या व्यक्तीची नवीन CFO म्हणून केली नियुक्ती

२०११ मध्ये त्यांनी आशिष शाह यांच्याबरोबर मिळून घर सजावट आणि फर्निचरसाठी एक ई-कॉमर्स व्यासपीठ Pepperfry सुरू केले. क्लायंट अजून त्यासाठी तयार आहेत का, याची त्यांना तेव्हा पूर्ण खात्री नव्हती. परंतु या उत्पादनांच्या विक्रीतही त्यांनी चांगले यश मिळवले. २०१३ मध्ये जेव्हा त्यांना वाटले की, फर्निचर-होम डेकोर व्यवसायात त्यांची चांगली पकड आहे, तेव्हा त्यांनी त्यावर लक्ष केंद्रित केले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambareesh murthy co founder and ceo of pepperfry passes away vrd