नवी दिल्ली : देशाच्या म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (ॲम्फी)’ने सरलेल्या वर्षात बाजारात पदार्पण केलेल्या जिओ फायनान्शिअलचा ‘लार्जकॅप’ समभाग श्रेणीत, तर इतर तीन नवोदित कंपन्या म्हणजेच टाटा टेक्नॉलॉजी, जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (इरेडा) यांचा ‘मिडकॅप’ श्रेणीत समावेश केला आहे. हा नवीन श्रेणी बदल १ फेब्रुवारीपासून लागू होत असून तो जुलै २०२४ पर्यंत सुरू राहील.

हेही वाचा >>> तर येत्या तीन वर्षात यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणी शक्य; ५० कोटी लोकांपर्यंत व्याप वाढवण्याचे उद्दिष्ट

लार्जकॅपमध्ये समावेश असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल आता ६७,००० कोटी रुपये आणि अधिक असे निर्धारित केले गेले आहे. जून २०२३ मध्ये हे प्रमाण ४९,७०० कोटी रुपये होते. तर मिडकॅप श्रेणीसाठी ते १७,४०० कोटींवरून २२,००० कोटी रुपये करण्यात आले आहे. ‘ॲम्फी’कडूून कंपन्यांचे वर्गीकरण बाजार भांडवलानुसार केले जाते. बाजार भांडवलानुसार पहिल्या १ ते १०० कंपन्या लार्जकॅप श्रेणीत, मिडकॅपसाठी ते नंतरच्या दीडशे म्हणजे १०१ ते २५० व्या क्रमांकांपर्यंतच्या कंपन्या आणि स्मॉलकॅपसाठी बाजार भांडवलानुसार २५१ व्या क्रमांकापासून पुढील कंपन्या असे हे वर्गीकरण आहे.

अपेक्षित बदल काय?

‘ॲम्फी’कडून मुख्यत्वे करून सक्रिय व्यवस्थापित समभागसंलग्न (इक्विटी) म्युच्युअल फंडांच्या निधी व्यवस्थापकांसाठी ही यादी प्रदर्शित केली जाते. समभागांच्या श्रेणीतील बदलानुसार, स्मॉल, मिड तसेच लार्जकॅप फंडांच्या निधी व्यवस्थापकांना त्यांच्या पोर्टफोलियोतही आनुषंगिक फेरसंतुलन आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे श्रेणीबदल झालेल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये उलाढाल लक्षणीय वाढून, त्याचे प्रत्यंतर समभागांच्या भावातील चढ-उतारातही स्वाभाविकपणे दिसून येईल.

मिड ते लार्जकॅप संक्रमण

पीएफसी, आयआरएफसी, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, पॉलीकॅब इंडिया, आरईसी, श्रीराम फायनान्स, युनियन बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांचा मिडकॅपमधून लार्जकॅपमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर स्मॉलकॅपमधून मिडकॅपमध्ये आलेल्या समभागांमध्ये माझगाव डॉक, सुझलॉन एनर्जी, लॉइड्स मेटल्स, एसजेव्हीएन, कल्याण ज्वेलर्स, केईआय इंडस्ट्रीज, क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण, एक्साइड इंडस्ट्रीज, निप्पॉन ॲसेट मॅनेजमेंट, अजंता फार्मा, नारायणा हृदयालय आणि ग्लेनमार्क फार्मा यांचा समावेश आहे.

Story img Loader