देशभरात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. शनिवारी (१ जून) निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं. तसेच निवडणुकीच्या निकालासंदर्भातील एक्झिट पोलदेखील जाहीर झाले आहेत. उद्या (४ जून) या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. दरम्यान, निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) अमुल दुधाच्या किंमतीत प्रती लीटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाच्या वाढलेल्या किंमती आजपासून (सोमवार, ३ जून) लागू झाल्या आहेत. जीसीएमएमएफने केलेल्या घोषणेनुसार अमुल दूध दोन रुपयांनी महागलं आहे. यामध्ये ‘अमुल गोल्ड’, ‘अमुल ताजा’, ‘अमुल शक्ती’चा समावेश आहे. ‘अमुल ताजा’ची सर्वात लहान पिशवी (पाव लीटर) वगळता इतर सर्व प्रकारच्या दुधाच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
अमुलने जाहीर केलेल्या नव्या किंमतींनुसार ‘अमुल गोल्ड’च्या अर्धा लीटरच्या पाऊचसाठी (पिशवी) आता ३२ ऐवजी ३३ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच ग्राहकांना अमुल गोल्डच्या एक लीटर पाऊचसाठी आता ६४ ऐवजी ६६ रुपये खर्च करावे लागणार आहेत. ‘अमुल ताजा’साठी (अर्धा लीटर) २६ ऐवजी २८ रुपये, ‘अमुल शक्ती’साठी (अर्धा लीटर) २९ ऐवजी ३० रुपये मोजावे लागणार आहेत. दुधाच्या वाढलेल्या किंमतींमुळे सामान्य नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
जीसीएमएमएफने यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये दुधाच्या किंमती वाढवल्या होत्या. ही दरवाढ करत असताना कंपनीने म्हटलं आहे की “शेतकऱ्यांचा, दूध उत्पादकांचा वाढलेला उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी आम्हाला ही दरवाढ करावी लागली आहे.” दुधाच्या किंमीत २ रुपयांची वाढ म्हणजेच एमआरपीमध्ये ३-४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. इतर अन्नधान्याच्या सरासरी महागाईपेक्षा ही दरवाढ कमी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
हे ही वाचा >> ललित मोदींच्या कुटुंबात संपत्तीवरून कलह; आईवरच केला भावाला बेदम मारहाणीचा आरोप, फोटोही केले शेअर!
जीसीएमएमएफने म्हटलं आहे की, अमुलच्या धोरणांनुसार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी ग्राहकांनी दिलेल्या रकमेपैकी ८० टक्के रुक्कम दूध उत्पादकांना दिली जाते. दुधाच्या विक्री मूल्यात केलेल्या सुधारणा आमच्या दूध उत्पादकांना पुरेसे पैसे देण्यासाठी, किफायतशीर दूध दर (दूध उत्पादकांना दिले जाणारे पैसे) टिकवून ठेवण्यासाठी मदत करेल. तसेच अधिकाधिक दूध उत्पादन करण्यास प्रोत्साहन देईल. अमुलपाठोपाठ आता इतरही दूध उत्पादक कंपन्या त्यांच्या दुधाच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच निवडणूक पार पडताच गुजतार मिल्क मार्केटिंग फेडरेशन दुधाच्या किंमती वाढवल्यामुळे आता सर्वसामान्य जनता आणि विरोधक थेट सरकारवर संताप व्यक्त करू लागले आहेत.