वृत्तसंस्था, नवी दिल्ली
झी आणि सोनी यांच्या विलीनीकरणाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात (एनसीएलटी) दाद मागण्यास झी कंपनीला मनाई करावी, यासाठी सोनी समूहाने केलेली याचिका सिंगापूरमधील आंतरराष्ट्रीय लवादाने फेटाळली. झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेस लिमिटेडने सोमवारी ही माहिती दिली आहे.
सोनी समूहाच्या मालकीच्या भारतातील कंपन्या कल्व्हर मॅक्स आणि बांगला एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड (बीईपीएल) यांनी सिंगापूरमधील आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रासमोर ही याचिका केली होती. झी एंटरटेन्मेंटला विलीनीकरणाच्या कार्यवाहीबाबत एनसीएलटीकडे दाद मागण्यास मनाई करावी,अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. लवादाने या प्रकरणी आदेश देण्यासाठी कार्यक्षेत्र नसल्याचे निरीक्षण नोंदविले, अशी माहिती झीने भांडवली बाजाराला दिली.
हेही वाचा >>>रामलल्लाचा दररोज नवनवा विक्रम, ११ दिवसांत २५ लाख भाविक दर्शनासाठी पोहोचले; ‘इतके’ कोटी मिळाले दान
सोनी समूहाने कल्व्हर मॅक्स एंटरटेन्मेंट (आधीची सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया) आणि बीईपीएल यांच्या झीसोबतच्या विलीनीकरणातून मागील महिन्यात माघार घेतली होती. झीने विलीनीकरणाच्या अटी पूर्ण केल्या नसल्याचा दावा सोनीने केला होता. त्यामुळे सोनीने या प्रकरणी सिंगापूरमधील आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रात धाव घेत विलीनीकरण रद्द करण्यासाठी ९ कोटी डॉलरची (सुमारे ७४८.५ कोटी रुपये) मागणी केली होती.या प्रकरणी झीनेही एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. त्यात विलीनीकरण पूर्ण करण्यासाठी सोनी समूहाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, सोनी समूहाने सिंगापूरमधील लवादासमोर सादर केलेल्या याचिकेवर कायदेशीर कार्यवाहीसुद्धा झीने केली होती.
हेही वाचा >>>पेटीएम ॲप सुरू राहणार? पेटीएम ॲपबाबत कंपनीने काय सांगितले? ‘पेटीएम’चा समभाग तळाला
सोनी पूर्ण लवादाकडे दाद मागणार
सिंगापूरमधील तातडीच्या आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयाविरोधात सोनी आता दाद मागणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, तातडीच्या लवादाचा निर्णय निराशाजनक आहे. झी एंटरटेन्मेंटला ‘एनसीएलटी’कडे दाद मागण्यास मनाई करावी, अशी मागणी आम्ही केली होती. आता पूर्ण आंतरराष्ट्रीय लवादासमोर आम्ही या प्रकरणी दाद मागणार आहोत. आताचा निर्णय हा केवळ प्रक्रियेचा भाग आहे.