वृत्तसंस्था, नवी दिल्ली
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात मुकेश अंबानी यांचे कनिष्ठ पुत्र अनंत अंबानी यांची निवड अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत. या प्रस्तावाच्या विरोधात मत द्यावे, अशी शिफारस दोन सल्लागार संस्थांनी भागधारकांना केली आहे.
संस्थात्मक गुंतवणूकदारांप्रमाणे सुज्ञतेने निर्णय घेण्याची क्षमता व साधने उपलब्ध नसलेल्या, छोट्या वैयक्तिक गुंतवणूकदार / भागधारकांनी हितकारक ठरेल अशी कोणती भूमिका घ्यावी व कसे मतदान करावे, या अंगाने सल्लागार संस्थांकडून मोलाचे मार्गदर्शन होत असते. अशा संस्थांपैकीच एक इन्स्टिट्यूशन शेअरहोल्डर सर्व्हिसेस (आयएसएस) ही आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्था आणि मुंबईस्थित इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ॲडव्हायजरी सर्व्हिसेस (आयआयएएस) या दोन संस्थांनी रिलायन्सच्या भागधारकांना सध्या सुरू असलेल्या ई-मतदानासंबंधाने शिफारस केली आहे. त्यात अनंत अंबानी यांचे वय कमी असल्याचा आणि अनुभव नसल्याचा मुद्दा उपस्थित करून, त्यांना रिलायन्स संचालक मंडळात स्थान मिळू नये अशी या संस्थांची भूमिका आहे.
हेही वाचा… ऑनलाइन खरेदीकडे पुणेकरांचा कल
‘आयएसएस’ने १२ ऑक्टोबरच्या टिपणात हा मुद्दा मांडला होता. ब्लूम्बर्ग या वृत्तसंस्थेला प्राप्त झालेल्या टिपणानुसार, अनंत अंबानी यांना नेतृत्वाचा अथवा संचालक मंडळावर कार्याचा सुमारे सहा वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे अनंत अंबानी यांची संचालक मंडळात निवड करण्याच्या विरोधात मतदान करण्याची शिफारस भागधारकांना करण्यात येत आहे. याचवेळी संस्थेने अनंत यांची मोठी भावंडे ईशा आणि आकाश अंबानी यांच्या संचालक मंडळातील निवडीला पाठिंबा दिला आहे. ‘आयएसएस’च्या आधी ‘आयआयएएस’ने ९ ऑक्टोबरला अहवाल दिला होता. त्यात अनंत अंबानी यांचे वय २८ वर्षे असून, त्यांची नियुक्ती मतदानाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बसत नाही. आकाश आणि ईशा यांच्या नियुक्तीला ‘आयआयएएस’नेही पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, ग्लास लुईस या सल्लागार संस्थेने अनंत अंबानी यांच्या नियुक्तीच्या बाजूने कौल दिला आहे. ग्लास लुईसचे संचालक डेकी विंडार्टो म्हणाले की, अनंत अंबांनी यांच्या अनुभवाचा मुद्दाच गैरलागू आहे. कारण त्यांच्यापेक्षा केवळ तीन वर्षे जास्त वय असलेले इतर दोघेही संचालक मंडळात समाविष्ट झाले आहेत.
रिलायन्सच्या भागधारकांचे ई-मतदान २६ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी वारसा नियोजनाअंतर्गत, आपले उत्तराधिकारी निवडण्याचे पहिले पाऊल टाकताना, ईशा, आकाश आणि अनंत या तिन्ही मुलांची संचालक मंडळात नियुक्ती जाहीर केली होती. ई-मतदानातून भागधारकांच्या मंजुरीनंतर त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
पुरेसा अनुभव असल्याचा दावा
रिलायन्सने सल्लागार संस्थांना उत्तर दिले आहे. त्यात स्पष्ट करण्यात आले आहे की, अनंत अंबानी यांच्याकडे पुरेसा अनुभव असून, संचालक मंडळाच्या चर्चेत मूल्यात्मक भर टाकण्याची परिपक्वता त्यांच्याकडे आहे. रिलायन्स समूहाच्या अनेक व्यवसायांमध्ये त्यांचा सहभाग आहे. याचबरोबर अनेक वर्षे ते वरिष्ठ नेतृत्वाच्या देखरेखीखाली काम करीत आहेत.