पीटीआय, नवी दिल्ली
उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र अनमोल यांना भांडवली बाजार नियंत्रक सेबीने एक कोटी रुपयांचा दंड केला आहे. रिलायन्स होम फायनान्सशी निगडित प्रकरणात हा दंड करण्यात आला आहे.

कंपनी कर्जांना मंजुरी देताना अनमोल अंबानी यांनी योग्य काळजी घेतली नसल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. याचबरोबर सेबीने रिलायन्स हाऊसिंग फायनान्सचे मुख्य जोखीम अधिकारी कृष्णन गोपालकृष्णन यांना १५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अनमोल अंबानी आणि गोपालकृष्णन यांना दंड भरण्यास ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, सेबीने ऑगस्ट महिन्यात अनिल अंबानी यांच्यासह इतर २४ जणांना भांडवली बाजारात व्यवहार करण्यास ५ वर्षांसाठी बंदी घातली होती. रिलायन्स होम फायनान्सचा निधी दुसरीकडे वळविल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. तसेच, त्यांना २५ कोटी रुपयांचा दंडही त्यावेळी ठोठाविण्यात आला होता.