जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेडचे संचालक आणि प्रवर्तक अनमोल सिंग जग्गी आणि पुनित सिंग जग्गी यांच्यावर सेबीने मार्केट सिक्युरिटी वापरण्यास बंदी घातल्यानंतर या दोघांनीही मंगळवारी राजीनामा दिला. सेबीने केलेल्या चौकशीत प्रचंड आर्थिक गैरव्यवहार आढळून आला आहे. जग्गी बंधूंनी इलेक्ट्रिकल वाहने अर्थात ईव्ही खरेदीसाठी घेतलेल्या ९७७ कोटी रुपयांचा गैरवापर केल्याची ममाहिती समोर आली आहे.
सेबीने दिलेल्या आदेशानंतर दोन्ही जग्गी बंधूंचा राजीनामा
जेनसोलच्या शेअर्सच्या किमतींमध्ये फेरफार आणि निधी वळवण्याच्या तक्रारींनंतर सेबीने जून २०२४ मध्ये चौकशी सुरू केली. तपासादरम्यान, सेबीला असे आढळून आले की कंपनीच्या प्रवर्तकांनी वैयक्तिक वापरासाठी निधी वळवला. यानंतर सेबीने दोन्ही भावांना संचालक पदावरून काढून टाकले. शेअर बाजारात व्यवहार करण्यावरही बंदी घालण्यात आली.
जेनसोल या तीन विभागांमध्ये कार्यरत
१) सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (एप्रिल-डिसेंबर २०२४ मध्ये ७२.३% महसूल)
२) ईव्ही लीजिंग: ब्लूस्मार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर ईव्ही भाड्याने देणे (महसूलाच्या २७.७%).
३) ईव्ही उत्पादन: पुण्यात दरवर्षी १२,००० कारची क्षमता असलेले ईव्ही उत्पादन युनिट उभारणे.
९७७.७५ कोटींची आर्थिक अफरातफर
कंपनीने इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन सारख्या संस्थांकडून ९७७.७५ कोटी रुपयांचे मुदत कर्ज घेतले. यापैकी ६,४०० इलेक्ट्रिक वाहने ६६४ कोटी रुपयांना खरेदी करायची होती, जी ब्लूस्मार्टला भाड्याने द्यायची होती. कंपनीला तिच्याकडून २० टक्के मार्जिन (१६६ कोटी रुपये) देखील गुंतवावे लागले. अशाप्रकारे, ईव्ही खरेदी करण्यासाठी एकूण ८३० कोटी रुपये खर्च करायचे होते. तथापि, फेब्रुवारी २०२५ पर्यंत ५६७.७३ कोटी किंमतीची केवळ ४,७०४ वाहने खरेदी करण्यात आली. २६२.१३ कोटींचा हिशेब देता आला नाही. सेबीला त्यांच्या तपासात असे आढळून आले की जेव्हा जेव्हा ईव्ही खरेदीसाठी जेनसोलमधून गो-ऑटोला निधी हस्तांतरित केला गेला, तेव्हा बहुतेक प्रकरणांमध्ये हे निधी एकतर कंपनीकडे परत हस्तांतरित केले गेले किंवा जेनसोलचे प्रवर्तक अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडले गेलेल्या संस्थांना पाठवले गेले.
अरुण मेनन यांनी काय म्हटलं आहे?
जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेडचे स्वतंत्र संचालक अरुण मेनन यांनी संचालक मंडळाला पाठविलेल्या राजीनाम्यात असा उल्लेख केला आहे की जुलै-ऑगस्ट २०२४ च्या सुरुवातीलाच त्यांनी कंपनीच्या कर्जाच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी जग्गी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी आणि व्याजाचा अतिरिक्त खर्च कमी करण्यासाठी मदत करण्याचाही सल्लाही दिला. मात्र आपल्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. आपण परमार यांच्यामार्फत कंपनीच्या सीएफओला भेटण्याचा प्रयत्न करूनही बैठका झाल्या नाहीत, असेही मेनन यांनी सांगितलं आहे.
४३ कोटींचं अपार्टमेंट २६ लाखांचं गोल्फ किट वापरणारे अनमोल जग्गी कोण आहेत?
भारतीय बाजार नियामक सेबी (SEBI) जेनसोल इंजिनीअरिंगचे प्रवर्तक अनमोलसिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांच्यावर कारवाई केली आहे. सेबीने या दोघांनाही कंपनीत संचालक होण्यास आणि शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. त्यांनी कंपनीच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. सेबीनं कंपनीच्या शेअर्स स्प्लिट करण्याच्या योजनेलाही स्थगिती दिलीये. तर दुसरीकडे अनमोल सिंग जग्गी यांची लक्झरी लाईफही समोर आलं आहे. financialexpress.com ने हे वृत्त दिलं आहे.
सेबीनं यासंदर्भात मोठा खुलासा केलाय. सेबीच्या अंतरिम आदेशात म्हटले आहे की, अनमोल सिंग जग्गीने कंपनीच्या कर्जाच्या पैशातून गुरुग्राममध्ये एक महागडा फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटची किंमत ४३ कोटी रुपये आहे. हा फ्लॅट ‘द कॅमेलियास’ नावाच्या पॉश ठिकाणी आहे. सेबीच्या आदेशानुसार अनमोलसिंग जग्गी यांनी एका कार डीलरमार्फत पैसे वळवले. मग त्या पैशांतून त्यानी आपल्याच एका कंपनीशी संबंधित व्यक्तीला पैसे दिले. त्यानंतर त्या व्यक्तीने या पैशांचा वापर फ्लॅट खरेदी करण्यासाठी केला. केवळ अपार्टमेंटच नाही तर अशी अनेक माहिती समोर आली आहे ज्यावरून जग्गी किती लक्झरी आयुष्य जगत होते हे समोर आलं आहे.