वृत्तसंस्था, नवी दिल्ली
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने किराणा क्षेत्रातील अंग असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या प्रारंभिक समभाग विक्रीची (आयपीओ) योजना आखली असून, त्यापूर्वी कंपनीमधील ८ ते १० टक्के भागभांडवली हिस्सा विकण्याचे तिचे नियोजन आहे.
दोनच दिवसांपूर्वी कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने रिलायन्स रिटेलमध्ये ८,२७८ कोटी रुपये गुंतविण्याची घोषणा केली असून, त्याबदल्यात कंपनीतील ०.९९ टक्के हिस्सा खरेदी केला जाणार आहे. कंपनीचे सध्याचे बाजारमूल्य १०० अब्ज डॉलर आहे. रिलायन्स समूहाकडून पुढील वर्ष ते सव्वा वर्षाच्या कालावधीत रिलायन्स रिटेलची हिस्साविक्री पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या हिस्साविक्रीनंतर भविष्यात कंपनीला भांडवली बाजारात सूचिबद्ध करण्याचा मार्ग खुला केला जाईल.
आणखी वाचा-‘टेस्ला’च्या स्वागतासाठी पायघडय़ा? आयात शुल्क १५ टक्क्यांवर आणण्याच्या केंद्राच्या हालचाली
रिलायन्सच्या २०१९ मधील वार्षिक सर्वसाधारण सभेत, मुकेश अंबानी यांनी समूहातील दूरसंचार आणि किराणा व्यवसायांच्या स्वतंत्र कंपन्या भांडवली बाजारात सूचिबद्ध करण्याची योजना सर्वप्रथम जाहीर केली होती. तर आठवड्यापूर्वी जिओ फायनान्शियलच्या रूपात वित्तीय सेवा क्षेत्रातील समूहातील विलग झालेल्या कंपनीचे बाजारात पदार्पण झाले आहे.
वार्षिक सभेतील घोषणेबाबत उत्सुकता
गेल्या काही वर्षांत रिलायन्स समूहातील मुकेश अंबानी यांनी समूहाच्या व्यवसायविस्ताराच्या अनेक धमाकेदार घोषणांसाठी व्यासपीठ म्हणून भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा खुबीने वापर केला आहे. त्यामुळे येत्या सोमवारी (२८ ऑगस्ट) नियोजित ४६ व्या वार्षिक सभेतून नेमके काय घोषित केले जाते आणि भागधारकांच्या हाती काय लागते, याबाबत उत्सुकता वाढली आहे. किराणा तसेच दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या ‘आयपीओ’ प्रक्रियेसाठी पदपथ रचला जाईल, अशी आशा बहुतांशांकडून केली जात आहे.