हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी चांगलेच कात्रीत सापडले होते. त्याचे परिणाम शेअर बाजारावर देखील दिसले. अदाणी समूहाच्या अनेक कंपन्यांचे समभाग घसरले होते. त्यानंतर अदाणी समूहाच्या एफपीओमध्ये झालेली गुंतवणूक देखील अदाणी यांनी परत केली. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरुन अदाणी समूहासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. फ्रान्सच्या टोटल एनर्जीज या ऊर्जा क्षेत्रातील बलाढ्य कंपनीने अदाणी समूहाबरोबर केलेली भागीदारी स्थगित केली आहे. अदाणींच्या तब्बल ५० अब्ज डॉलर्सच्या हायड्रोजन प्रकल्पात ही कंपनी सर्वांत मोठी परदेश गुंतवणूक आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील आरोपांबाबत स्पष्टीकरण मिळाल्याशिवाय प्रकल्प पुढे जाणार नसल्याचे टोटल एनर्जीजने जाहीर केले आहे.
मागच्या वर्षी जूनमध्ये टोटल एनर्जीजने अदाणी समूहाबरोबर भागीदारी जाहीर केली होती. फ्रान्सीस समूहाचे मुख्य कार्यपालक पॅट्रिक पौयान यांनी सांगितले की, मागच्या वर्षी जून महिन्यात अदाणी समूहासोबत आम्ही भागीदारी जाहीर केली होती. मात्र आतापर्यंत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या नव्हत्या. जून २०२२ रोजी झालेल्या घोषणेनुसार टोटल एनर्जीज ने अदाणी समूहाची कंपनी अदाणी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (एएनआयएल) सोबत २५ टक्के भागिदारी घ्यायची होती. हरित हायड्रोजन प्रकल्पासाठी पुढील दहा वर्षांसाठी तब्बल ५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार होती. २०३० च्या आधी एक अब्ज टन क्षमतेचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
पॅट्रिक यांनी पुढे सांगितले की, जोपर्यंत परिस्थिती स्पष्ट होत नाही, तोपर्यंत हायड्रोजन प्रकल्पावर स्थगिती देण्यात आली आहे. अदाणी ग्रूपवर ३.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक टोटल एनर्जीजने केली आहे. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदाणी समूहाकडून येणाऱ्या ऑडिट अहवाल येण्याची वाट पाहण्याचे ठरविले आहे.