नवी दिल्ली: भारतीय बँकांच्या ताब्यात माझ्या १४ हजार १३१ कोटी रुपयांच्या मालमत्ता आहेत. ही रक्कम माझ्यावरील थकीत सरकारी बँकांच्या कर्जाच्या दुप्पट आहे, असा दावा फरार उद्योगपती विजय मल्या याने सोमवारी केला.

कर्जबुडव्यांच्या विरोधात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईचा तपशील केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वार्षिक अहवालात देण्यात आला आहे. या अहवालाचा हवाला देत मल्या याने वरील दावा केला आहे. या अहवालातील तपशिलाप्रमाणे, बँकांनी मल्याकडून १४ हजार १३१ कोटी रुपयांची वसूली केली आहे, तर कर्जवसुली न्यायाधिकरणाने मल्या याच्यावर ६ हजार २०३ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा निवाडा दिला होता.

या पार्श्वभूमीवर मल्या याने समाज माध्यमावर म्हटले आहे की, न्यायाधिकरणाने माझ्यावरील कर्जाची रक्कम ६ हजार २०३ कोटी रुपयांची असल्याचा निर्वाळा दिला होता. आता माझ्याकडून १४ हजार १३१ कोटी रुपयांची वसूल केल्याचे समोर आले आहे. ब्रिटनमधील न्यायालयातील माझ्या दिवाळखोरीच्या अर्जासाठी हा पुरावा ठरणार आहे. मला आश्चर्य याचे आहे की, बँका आता तेथील न्यायालयात कोणती भूमिका मांडतील.

मल्या याने मार्च २०१६ मध्ये ब्रिटनमध्ये पलायन केले होते. किंगफिशर एअरलाइन्सला विविध बँकांनी दिलेले सुमारे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज त्याने थकविले आहे. भारताने मल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनमधील न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वीही मल्याने असे दावे केले आहेत. बँकांच्या कर्जाची १०० टक्के परतफेड करण्याची त्याने इच्छा दर्शविली होती, मात्र बँका आणि सरकारचा यात अडसर असल्याचा दावा त्याने केला होता.