टाटा समूह एअर इंडिया आणि विस्तारा यांचे विलीनीकरण करणार आहे, जेणेकरून त्यांच्या विमान कंपनीच्या ऑपरेशनमध्ये कार्यक्षमता वाढेल. टाटा समूहाने यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. विस्तारा आणि एअर इंडियाच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला सीसीआयने मंजुरी दिली आहे. मात्र, त्यात काही अटी घालण्यात आल्या आहेत.
ट्विटर प्लॅटफॉर्मवर CCI च्या पोस्टमध्ये असे सांगण्यात आले की, CCI ने टाटा SIA एअरलाइन्सचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. हे सिंगापूर एअरलाइन्सद्वारे एअर इंडियामधील काही शेअर्सच्या संपादनाच्या मंजुरीच्या आणि पक्षकारांनी प्रस्तावित केलेल्या ऐच्छिक वचनबद्धतेच्या अधीन आहे.
विस्तारामध्ये सिंगापूर एअरलाइन्सची ४९ टक्के हिस्सेदारी
विस्तारा आणि एअर इंडिया या विमान कंपन्या टाटा समूहाच्या अंतर्गत येतात. विस्तारा एअरलाइन ही टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. विस्तारामध्ये सिंगापूर एअरलाइन्सची ४९ टक्के हिस्सेदारी आहे. टाटा समूहाच्या वतीने या वर्षी एप्रिलमध्ये सीसीआयकडे या प्रस्तावाची मंजुरी मागितली होती. जूनमध्ये सीसीआयने प्रस्तावित विलीनीकरणासाठी अधिक तपशील मागितला होता. या प्रस्तावात टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड, एअर इंडिया लिमिटेड, टाटा एसआयए एअरलाइन्स लिमिटेड आणि सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेड यांचा समावेश आहे.
हेही वाचाः कच्च्या तेलावर विंडफॉल कर कपात, जाणून घ्या त्याचा काय परिणाम होणार?
विलीनीकरणानंतर एअर इंडिया देशातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय विमान कंपनी बनणार
या विलीनीकरणानंतर एअर इंडिया देशातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय आणि दुसऱ्या क्रमांकाची देशांतर्गत विमान कंपनी बनेल. या विलीनीकरणात सिंगापूर एअरलाइन्सला अतिरिक्त शेअर्स दिले जातील. याबरोबरच एअर इंडिया एक्सप्रेस आणि एआयएक्स कनेक्ट (एअर एशिया इंडिया) यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. टाटा समूहाने २०२२ मध्ये केंद्र सरकारकडून एअर इंडियाची खरेदी केली होती.