नवी दिल्ली : देशातील पगारदार वर्गाचा हिरमोड करणारे सर्वेक्षण पुढे आले असून, २०२४ सालात वेतनवाढीचा दर मागील वर्षापेक्षा किंचित कमी राहिल असा त्याचा निष्कर्ष आहे. २०२४ मध्ये पगारात सरासरी ९.५ टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे, त्या उलट २०२३ मध्ये वेतनवाढीचे सरासरी प्रमाण यापेक्षा किंचित जास्त ९.७ टक्के असे होते.
हेही वाचा >>> ‘झी’मधील आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीचा विस्तार;‘सेबी’कडून कंपनीच्या अनेक माजी संचालकांना समन्स
व्यावसायिक सेवा क्षेत्रातील जागतिक कंपनी एऑन पीएलसीच्या मते, करोना महासाथीतून सावरल्यानंतर २०२२ मध्ये उच्च वेतनवाढ जरी अनेकांनी अनुभवली असली तरी नजीकच्या काळात पगारवाढीचे प्रमाण दोन अंकी पातळीपुढे जाणे अवघड दिसून येते. तिने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक वेतनवाढ आणि उलाढाल सर्वेक्षण २०२३-२४ साठी जवळपास ४५ उद्योग क्षेत्रांमधील १,४१४ कंपन्यांकडून उपलब्ध तपशिलांचे विश्लेषण केले आहे.
औपचारिक क्षेत्रातील पगारातील अंदाजित वाढ ही बदलत असलेल्या आर्थिक परिस्थितीला प्रतिसादरूपात घेतला जाणारा धोरणात्मक निर्णय असतो. जागतिक अर्थचित्र मलूल असूनही, भारतात पायाभूत सुविधा विकास क्षेत्र आणि निर्मिती क्षेत्राने मजबूत वाढ कायम ठेवली आहे, ज्यातून विशिष्ट व्यवसाय क्षेत्रांवर लक्ष्यित गुंतवणुकीच्या गरजेलाही दर्शवले आहे, असे एऑनचे भारतातील मुख्य वाणिज्यिक अधिकारी रुपांक चौधरी म्हणाले.
सर्वेक्षणातून असेही दिसून आले आहे की, कर्मचारी गळतीचे आणि नोकरी सोडून जाण्याचे (ॲट्रिशन) प्रमाण २०२२ मधील एकूण २१.४ टक्क्यांवरून २०२३ मध्ये १८.७ टक्क्यांवर घसरले आहे. यातून रोजगाराच्या बाजारपेठेतील स्पर्धात्मकतेला अधोरेखित केले गेले आहे अर्थात चांगल्या वेतनमानाच्या नोकऱ्यांच्या संधी घटत चालल्या असल्याचे हे द्योतक आहे.
हेही वाचा >>> Stock Market Today : सलग सहा दिवसांच्या तेजीला मुरड…‘सेन्सेक्स’ची चार शतकी गटांगळी
तरी जगात सर्वाधिक वाढ
जागतिक स्तरावर भू-राजकीय तणावाच्या परिणामी मंदीसदृश चित्र असताना, भारताने अपेक्षित सरासरी ९.५ टक्के दराने म्हणजे जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक पगारवाढीचे प्रमाण दर्शविले आहे. भारतानंतर बांगलादेश आणि इंडोनेशिया या देशांमध्ये २०२४ मध्ये अनुक्रमे ७.३ टक्के आणि ६.५ टक्के सरासरी पगारवाढ होणे अंदाजण्यात आले आहे.
क्षेत्रवार वेतनवाढ कशी?
सर्वेक्षणानुसार उद्योग क्षेत्रवार विभागणी केल्यास, वित्तीय संस्था, अभियांत्रिकी, वाहन निर्मिती व वाहन पूरक निर्मिती क्षेत्र आणि जैवविज्ञान ही सर्वाधिक पगारवाढीची क्षेत्रे असतील. तर आधुनिक किराणा क्षेत्र (रिटेल) आणि तंत्रज्ञान सल्लागार आणि संलग्न सेवांमध्ये सर्वात कमी पगारवाढ दिसून येईल.