Apple airlifts 600 tons of iPhones from India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धाचा प्रभाव जगभरातील बाजारपेठांवर पाहायला मिळत आहे. यापासून अमेरिकेतील कंपन्या देखील सुटलेल्या नाहीत. ट्रम्प यांच्या आयातशुल्काला बगल देण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी अॅपलने एक विशेष युक्ती वापरली आहे. अॅपलने भारतातून ६०० टन म्हणजेच जवळपास १५ लाख आयफोन खासगी विमानाने अमेरिकेत नेले आहेत. रॉयटर्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे विमानाने आयफोन अमेरिकेत घेऊन जाण्यासाठी कंपनीने भारतीय कारखान्यांमधील उत्पन्न वाढवले असल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेतील सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी असलेल्या अॅपलने ट्रम्प यांनी लादलेल्या आयातशुल्कातून मार्ग काढण्यासाठी विशेष युक्ती वापरली आहे. त्यांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या अमेरिकेत कंपनीकडून आयफोनची साठवणूक करण्याचे गुप्त धोरण अवलंबले जात आहे.
अॅपलच्या स्मार्टफोन निर्मितीचे मुख्य केंद्र हे चीन आहे कंपनी याच देशावर आयफोनच्या उत्पादनासाठी अवलंबून आहे. पण ट्रम्प यांनी चीनवर १२५ टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेतील आयफोन्सच्या किमती वाढू शकतात अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती. चीनवर लावण्यात आलेले आयातशुल्क भारताच्या तुलनेने खूपच जास्त आहे. भारतातील आयातीवरील २६ टक्के कर लावण्यात आला होता, परंतु आता ट्रम्प यांनी चीन वगळता इतर देशांवरील आयातशुल्क ९० दिवसांसाठी स्थगित केले आहे.
इतकेच नाही तर आयातशुल्क टाळण्यासाठी कंपनी विमानतळ आधिकाऱ्यांबरोबर मिळून काम करत आहे. त्यांनी भारतीय विमानतळ अधिकार्यांना तमिळनाडूमधील चेन्नई विमानतळावर कस्टम्स क्लिअर करण्यासाठी लागणारा वेळ ३० तासांवरून सहा तासांपर्यंत कमी करण्याची विनंती केली असल्याचे माहिती सुत्रांनी दिली आहे.
१५ लाख आयफोन रवाना
मार्च महिन्यापासून १०० टन क्षमतेची जवळपास ६ कार्गो विमाने भरून आयफोन भारतातून पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी तसेच भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान रॉयटर्सने केलेल्या मोजणीनुसार, पॅक केलेल्या आयफोन १४ आणि त्याच्या चॅर्जिंग वायरचे वजन हे ३५० ग्रॅम असते, म्हणजेच पॅकेजिंगच्या वजनासह एकूण ६०० टन कार्गोमध्ये सुमारे १.५ दशलक्ष आयफोन होते. मात्र याबद्दल अॅपल आणि भारतीय उड्डाण मंत्रालयाने कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. तसेच सर्व सुत्रांनी त्यांची नावे गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे.
अॅपल दरवर्षी जगभरात २२० दशलक्षाहून अधिक आयफोन्सची विक्री करते. काउंटरपॉइंट रिसर्चने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अमेरिकेत होणाऱ्या एकूण आयफोन आयातीपैकी पाचवा भाग सध्या भारतातून येतो आणि उर्वरित आयात ही चीनमधून होते.
भारतातील कारखान्यांमध्ये रविवारीही काम सुरू
यादरम्यान अॅपलने भारतात आयफोन प्लांटमध्ये नेहमीच्या उत्पादनात २० टक्के वाढवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एअर शिपमेंट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कामगारांची संख्या वाढवण्यात आली आहे. याबरोबरच अॅपलचा भारतातील सर्वात मोठ्या फॉक्सकॉन इंडिया प्लांटमध्ये तात्पुरत्या स्वरूपात रविवारी देखील काम केले जात आहे, असे सूत्रांनी सांगितले. इतर दोन सुत्रांनी देखील चेन्नई येथील फॉक्सकॉनच्या प्लांटमध्ये रविवारी देखील काम सुरू असल्याची पुष्टी केली आहे.
गेल्या वर्षी या प्लांटमधून २० दशलक्ष आयफोन्सची निर्मिती करण्यात आली होती, ज्यामध्ये नुकतेच लाँच झालेल्या आयफोन १५ आणि १६ मॉडेल्सचा देखील समावेश होता.
अॅपल कंपनीने चीनमध्ये होणाऱ्या उत्पादनाता विविधता आणण्यासाठी, चीनवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी भारताचा पर्याय निवडला होता. सध्या फॉक्सकॉन आणि टाटा हे त्यांचे भारतातील दोन मुख्य पुरवठादार आहेत. त्यांचे एकूण तीन कारखाने असून अजून दोन नवीन कारखाने उभारले जात आहेत.
तसेच अॅपलने चेन्नई येथे जलद कस्टम क्लिअरन्स मिळवण्यासाठी सुमारे आठ महिने नियोजन केले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अधिकाऱ्यांना अॅपलला मदत करण्याची विनंती केली होती, अशी माहिती एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने दिली आहे.
कस्टम डेटानुसार, फॉक्सकॉनच्या भारतातून अमेरिकेत पाठवलेल्या मालाचे मूल्य वाढून जानेवारीमध्ये ७७० दशलक्ष डॉलर्स आणि फेब्रुवारीमध्ये ६४३ दशलक्ष डॉलर्सवर झाले आहे, जे मागील चार महिन्यांत ११० दशलक्ष ते ३३१ दशलक्ष डॉलर्सच्या दरम्यान होते.