मुंबई : अमेरिकी तंत्रज्ञान नाममुद्रा आयफोनची भारतीयांमध्ये लोकप्रियता उत्तरोत्तर वाढत असून, याचा प्रत्यय म्हणजे ॲपल इंडियाने मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात महसुलामध्ये ४८ टक्के वाढ नोंदविली आहे. कंपनीचा महसूल ४९,३२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
आयफोनला भारतातील वाढती मागणी पाहता टाटा समूहाकडून त्यांची भारतात लवकरच निर्मिती केली जाणार आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठ्यासह, निर्यात बाजारपेठेचीही काळजी यातून घेतली जाणार आहे.
व्यवसाय गुणवत्ता क्षेत्रातील टॉफलर या संस्थेने ॲपल इंडियाचे वित्तीय तपशील जाहीर केले आहेत. त्यानुसार, ॲपल इंडियाने मागील आर्थिक वर्षात ४९,३२२ कोटी रुपयांचा महसूल मिळविला. त्याआधीच्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल ३३,३८१ कोटी रुपये होता. कंपनीचा नफा मागील आर्थिक वर्षात ७७ टक्क्यांनी वाढून २,२३० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात तो १,२६३ कोटी रुपये होता. कंपनीचा एकूण खर्च मागील आर्थिक वर्षात ४६,४४४ कोटी रुपये असून, त्याआधीच्या आर्थिक वर्षात तो ३१,६९३ कोटी रुपये होता.