रशियन तेल क्षेत्रातील दिग्गज रोझनेफ्ट ऊर्जा कंपनीने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) चे माजी संचालक जीके सतीश म्हणजेच गोविंद कोटीस सतीश यांची त्यांच्या बोर्डावर नियुक्ती केली आहे. रशिया भारताबरोबरचे व्यावसायिक संबंध वाढविण्याच्या विचारात असल्याचे हे संकेत मानले जात आहेत. ऊर्जा कंपनी Rosneft ने जारी केलेल्या निवेदनानुसार, जीके सतीश हे Rosneft च्या ११ जणांच्या संचालक मंडळावर निवडून आलेल्या तीन नवीन सदस्यांपैकी एक आहेत. रोझनेफ्टच्या संचालक मंडळावर नियुक्त झालेले ते पहिले भारतीय आहेत. ६२ वर्षीय जीके सतीश आयओसीमध्ये व्यवसाय विकास संचालक होते. त्यांनी २०२१ मध्ये IOC मधून निवृत्ती घेतली.
रोझनेफ्टच्या मंडळात कतार आणि फिलिपिन्सच्या प्रतिनिधींचाही समावेश
रोझनेफ्टच्या मंडळात कतार आणि फिलिपिन्सचे प्रतिनिधीदेखील आहेत. “मोहम्मद बिन सालेह अल सदा (दोहा युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष) यांची रोझनेफ्ट ऑइल कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे,” असंही रोझनेफ्टने सांगितले आहे. Rosneft ची रशियातील तेल आणि वायू क्षेत्रातील भारतीय कंपनी IOC इंडियन ऑइल कॉर्पोरेशनबरोबर भागीदारी आहे. रोझनेफ्ट IOC आणि इतर भारतीय कंपन्यांना कच्चे तेल देखील विकते आणि अलिकडच्या काही महिन्यांत गुजरात रिफायनर्सनाही तेलाचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. जीके सतीश यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते, कारण Rosneft आता भारतीय कंपन्यांबरोबर लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) च्या विक्रीसह अधिक करार करण्याकडे लक्ष देत आहे.
हेही वाचाः बांगलादेश डॉलरपेक्षा आता रुपयाला महत्त्व देणार; दोन बँकांनी बनवला जबरदस्त प्लॅन
सतीश हे पेट्रोलियम उत्पादनाच्या मार्केटिंगमधले तज्ज्ञ
सतीश यांना इंडियन ऑइल अँड गॅस मार्केटचे सखोल ज्ञान आहे. याशिवाय पेट्रोकेमिकल्स, लिक्विफाइड नॅचरल गॅस, इंटरनॅशनल ट्रेड आणि पेट्रोलियम प्रोडक्ट मार्केटिंगमध्ये ते तज्ज्ञ आहेत. सतीश हे रोझनेफ्ट बोर्डावरील पाच स्वतंत्र संचालकांपैकी एक आहेत.
हेही वाचाः देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचे कर्ज महागले, EMI वाढणार
इंडियन ऑइल अदाणी गॅस प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्षही होते
सतीश हे १ सप्टेंबर २०१६ पासून IOC बोर्डावरील त्यांच्या कार्यकाळात इंडियन ऑइल अदाणी गॅस प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष होते. IOC ने CNG आणि पाइप्ड स्वयंपाकाच्या गॅसच्या किरकोळ विक्रीसाठी अदाणी समूहाबरोबर संयुक्त उपक्रम राबवला होता. या उपक्रमामुळे अदाणी समूहाला सिटी गॅस क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली आणि तो आता सर्वात मोठा ऑपरेटर आहे.
२०२२ मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून ValPro मध्ये सामील झाले
रोझनेफ्टने सांगितले की, ३० जून रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या भागधारकांनी ११ सदस्यीय संचालक मंडळाची निवड केली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विश्वासू इगोर आय सेचिन हे रोझनेफ्टचे सीईओ आणि व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष राहतील. कंपनीने नियुक्त केलेल्या इतर सदस्यांमध्ये व्हॅल्यू प्रोलिफिक कन्सल्टिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (व्हॅलप्रो) चे व्यवस्थापकीय संचालक गोविंद कोटीस सतीश म्हणजे जीके सतीश यांचा समावेश आहे. सतीश २०२२ मध्ये ValPro मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते. फर्म विलीनीकरण, अधिग्रहण आणि गुंतवणूक बँकिंग विषयातील ते सल्लागार आहेत. आयओसीचे माजी अध्यक्ष एमए पठाण त्यांच्या सल्लागार मंडळावर आहेत आणि त्यांच्या उच्च व्यवस्थापनात आयओसीचे माजी अधिकारीही आहेत.
रशिया दरवर्षी १०० दशलक्ष टन कच्चे तेल भारतीय कंपन्यांना विकतो
रशिया दररोज सुमारे २ दशलक्ष बॅरल किंवा वार्षिक १०० दशलक्ष टन कच्चे तेल भारतीय कंपन्यांना विकतो. Rosneft ने IOC ला दरवर्षी ६ दशलक्ष टन कच्चे तेल विकण्याचा करार केला आहे. याव्यतिरिक्त Rosneft भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सह इतर सरकारी मालकीच्या रिफायनर्ससह समान करार करण्याचा विचार करीत आहे. Rosneft देखील नायरा एनर्जीचा बहुसंख्य मालक आहे, जी गुजरातमधील वाडिनार येथे वार्षिक २० दशलक्ष टन रिफायनरी चालवते आणि देशातील ६,३०० पेक्षा जास्त पेट्रोल पंपांची मालकी आहे. IOC ही भारतातील रशियन तेलाची सर्वात मोठी आयातदार आहे आणि Rosneft बरोबर दीर्घकालीन वितरण करार करणारी एकमेव कंपनी आहे.