आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया कंपनी महाराष्ट्रात ८०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. त्यासाठी कंपनीने राज्य सरकारला पाच हजार एकर जागा देण्याची विनंती केली आहे. यासोबतच कंपनीचे कॉर्पोरेट मुख्यालय बांधण्यासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (BKC) जागा उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. राज्य अतिथीगृह सह्याद्री येथे शुक्रवारी कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांच्याबरोबर गुंतवणुकीबाबत एक बैठक केली. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे डॉ. अमित सैनी, आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लिमिटेडचे विक्री संचालक आलेन लेगरीस उपलब्ध होते. राज्यातील पोलाद उद्योगात आणखी गुंतवणूक करण्याची इच्छाही कंपनीने व्यक्त केली आहे. बंदर, रस्ते आणि रेल्वेचे जाळे पसरलेल्या ठिकाणी कंपनीने पाच हजार एकर जागा मागितली आहे.
हेही वाचाः सुंदर पिचाईंचा पगार एका सामान्य कर्मचाऱ्याच्या ८०० पट अधिक, कंपनीचा मोठा खुलासा
पहिल्या टप्प्यात १००० एकर देण्यात तत्त्वतः मान्यता
पहिल्या टप्प्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे एक हजार एकर जमीन देण्यास उपमुख्यमंत्र्यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यासाठी मेरिटाईम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधी यांची स्वतंत्र बैठक घेऊन जमीन, शिल्लक जमीन आणि भूसंपादन प्रक्रिया ठरवण्यात येणार आहे. कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यातील हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आर्सेलर मित्तल निप्पॉन ही आंतरराष्ट्रीय कंपनी
आर्सेलर मित्तल निप्पॉन ही एक आंतरराष्ट्रीय पोलाद उत्पादक कंपनी आहे. कंपनीने महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे. रायगडमधील खोपोली, पुण्यातील तळेगाव आणि सिंधुदुर्गातील सातार्डा येथे कंपनीच्या गुंतवणुकीमुळे हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता कंपनी पोलाद उत्पादन, प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी ८०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे.
हेही वाचाः ५० हजारांत सुरू केलेल्या व्यवसायात कोट्यवधींची कमाई; भरपूर मागणी, जाणून घ्या प्रक्रिया