मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांचा पुन्हा एकदा सक्रिय सहभाग आणि जागतिक पातळीवरील स्थिर संकेतांमुळे मागील पाच सत्रांत तेजीवाल्यांनी भांडवली बाजाराचा ताबा घेतल्याचे दिसून आले. या सलग पाच सत्रांत गुंतवणूकदारांच्या झोळीत तब्बल १०.४३ लाख कोटींची भर पडली आहे.
बाजारात व्यवहार झालेल्या मागील पाच सत्रांत म्हणजेच २९ मार्च ते ६ एप्रिलदरम्यान मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात १०,४३,२१६.७९ कोटींची भर पडली आहे. त्यामुळे गुरुवारच्या सत्रात (६ एप्रिल) सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल २,६२,३७,७७६.१३ कोटींवर पोहोचले आहे. विद्यमान आठवड्यात, मंगळवारी (४ एप्रिल) महावीर जयंतीनिमित्त आणि शुक्रवारी ‘गुड फ्रायडे’निमित्त बाजारातील समभाग खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद होते. मात्र सुट्ट्यांमुळे कात्री लागलेल्या आठवड्यात, पाच सत्रांमध्ये मिळून ‘सेन्सेक्स’ने २,२१९.२५ अंशांनी म्हणजेच ३.८५ टक्क्यांनी झेप घेतली.
हेही वाचा – तुमच्या मुलीसाठी २१ वर्षांत बनवा ४१ लाखांचा निधी, नेमकी योजना काय?
बाजारात तेजीची कारणे
– परदेशी गुंतवणूकदार भांडवली बाजारात पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी यंदाच्या मार्च महिन्यात ८,००० कोटींची नक्त समभाग खरेदी केली. याचबरोबर एप्रिल महिन्यातदेखील त्यांच्याकडून समभाग खरेदीचा सपाटा सुरूच आहे.
– गुंतवणूकदारांनी मार्च तिमाहीची आर्थिक आकडेवारी जाहीर होण्याआधी पोर्टफोलिओमध्ये बदल करण्यास सुरुवात केली. बहुतांश चांगल्या आणि दिग्गज कंपन्यांचे मूल्यांकन सध्या कमी असल्याने, गुंतवणूकदारांनी अशा कंपन्यांच्या समभागांत गुंतवणूक करण्यास उत्साह दाखविला आहे. येत्या आठवड्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि बँकिंग क्षेत्रातील एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल जाहीर होतील.
– रिझर्व्ह बँकेने अनपेक्षितपणे व्याजदर ‘जैसे थे’ ठेवून सुखद धक्का दिला. परिणामी गुंतवणूकदारांसह कर्जदारांना दिलासा मिळाला आणि यातून बाजारात बँकिंग, वित्त, गृहनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांचे समभागांत भाव चैतन्य आले.