BharatPe चे सहसंस्थापक आणि प्रसिद्ध व्यावसायिक अशनीर ग्रोवर हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी कंपनीशी झालेला व्यवहार व त्यातून उद्भवलेला वाद यामुळे ते चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी कंपनीसाठी वापरलेल्या भाषेचा वाद थेट न्यायालयापर्यंत गेला होता. आता पुन्हा एकदा अशनीर ग्रोवर चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी भारतातील नव्या पिढीबाबत केलेलं विधान वादात सापडण्याची शक्यता आहे. भारतातली नवी पिढी अर्थात विशीतले तरुण त्यांच्याच जगात जगत असून बाहेर काय चाललंय याबद्दल त्यांना काहीही माहिती नसतं, असं अशनीर ग्रोवर म्हणाले आहेत.

इशान शर्मा नावाच्या २२ वर्षीय तरुणानं त्याच्या यूट्यूब चॅनलसाठी अशनीर ग्रोवर, आशीष मोहपात्रा, सार्थक अहुजा व संजीव बिकचंदानी या प्रसिद्ध व्यावसायिकांची मुलाखत घेतली. यावेळी इशान शर्मानं ग्रोवर यांना भारतातील उद्योग विश्व व तरुणांमधील उद्योगाभिमुख वृत्ती यावर भाष्य केलं. त्यांच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

“तुम्ही अमेरिकेत बघा. १६व्या वर्षी मुलं घरातून बाहेर पडतात. तुमचे आई-वडील जर सधन असतील तर ते तुमची पुढची फी भरतील. पण जर तसं नसेल तर पुढच्या शिक्षणाची फी, इतर खर्च हे इतर ठिकाणी काम करून मुलांना करावे लागतात. ते मेकडॉनल्ड्समध्ये काम करतात. जग कसं चालतं ते त्यांना फार लवकर माहिती होतं. आपल्याला वाटतं की अमेरिकेतल्या लोकांना जगाचा फारसा अनुभव नसतो. पण ते उलट आहे. अमेरिकेतली मुलं ही जास्त अनुभवी आहेत”, असं अशनीर ग्रोवर यावेळी म्हणाले.

Video: “तू महिन्याला ३५ लाख कमावतो?” अशनीर ग्रोवर यांना २२ वर्षीय तरुणाच्या उत्तराने बसला धक्का!

“बाहेरचं जग कसं चालतं ते माहितीच नाही”

“भारतातली आजची नवी पिढी ही पूर्णपणे त्यांच्याच जगात जगतेय. तुम्ही एका समाजात जगत आहात ज्याचे दरवाजे बंद आहेत. बाहेरचं जग कसं चालतंय हे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही गाडीत बसून जाता, ड्रायव्हर तुम्हाला इच्छित ठिकाणी घेऊन जातो. तुमची शाळा हेही तसंच बंदिस्त जग आहे. तुमचे शाळा-कॉलेजमधले क्लबही तसेच असतात. तिथे सारख्याच प्रकारच्या लोकांचे क्लब बनवले जातात. कारण जर पुढे प्रेम झालंच, तर सारख्याच प्रकारच्या लोकांमध्ये विवाह होतील”, असंही अशनीर ग्रोवर यांनी नमूद केलं.

“जेव्हा इथल्या तरुणांना अपयशाचा धक्का बसतो…”

दरम्यान, अपयशाचा सामना होतो तेव्हा भारतीय तरुण जमिनीवर येतात, असं विधान अशनीर ग्रोवर यांनी केलं आहे. “तुम्ही महाविद्यालयासाठी तयारी करण्यासाठी आठवी-नववीपासूनच काम करत आहात. तुम्ही जग पाहिलंच कुठे आहे? विसाव्या वर्षी ती व्यक्ती बाहेरच्या जगात येते तेव्हा त्या तरुणाला काहीच माहिती नसतं. तो तरुण काही बंदिस्त सुरक्षित वर्तुळांमध्येच जगत असतो. जेव्हा ६-७ वर्षं मेहनत घेतल्यानंतर तो तरुण अपयशाचा सामना करतो, जरा धक्के बसतात तेव्हा त्या बंदिस्त वर्तुळांना तडा जातो आणि तो तरुण जमिनीवर येतो”, असं अशनीर ग्रोवर म्हणाले.

Video: महिन्याला ३५ लाख कमावणारा २२ वर्षीय तरुण; कोण आहे इशान शर्मा, ज्यानं अशनीर ग्रोवर यांनाही धक्का दिला!

“मला वाटतं भारतात जे काही विशीतले तरुण आहेत, त्यांना जग कसं चालतं, अर्थव्यवस्था कशी चालते याची काहीही कल्पना नाहीये”, असंही ते म्हणाले.

Story img Loader