मुंबई : विद्युत दुचाकी निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी एथर एनर्जी लिमिटेडच्या २८ एप्रिलपासून सुरू झालेल्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) मंगळवारी दुसऱ्या दिवशी २८ टक्के भरणा करणारे अर्ज दाखल झाले. उल्लेखनीय म्हणजे किरकोळ गुंतवणूकदार राखीव असलेल्या हिश्शातील समभागांसाठी १०० टक्के मागणी करणारे अर्ज आले आहेत.

गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी अर्ज दाखल करण्याची बुधवार, ३० एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. नवीन २०२५-२६ आर्थिक वर्षातील या पहिल्या आयपीओद्वारे २,९८१ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे. यासाठी प्रति समभाग ३०४ रुपये ते ३२१ रुपये असा किंमत पट्टा निर्धारीत करण्यात आला आहे.

आयपीओच्या माध्यमातून कोणत्याही नवीन समभागांची विक्री केली जाणार नसून, कंपनीचे प्रवर्तक आणि भागधारकांच्या हिश्शातील सुमारे १.१ कोटी समभागांची विक्री या माध्यमातून होत आहे. आयपीओचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ॲक्सिस कॅपिटलकडून उपलब्ध तपशिलानुसार, किरकोळ गुंतवणूकदार, कर्मचारी यांच्यासाठी राखीव हिश्शासाठी अनुक्रमे १.१२ पट आणि ३.१८ पट भरणा पूर्ण झाला आहे, तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.२८ पट मागणी नोंदवणारे अर्ज आले आहेत.

कंपनीने आयपीओ-पूर्व सुकाणू गुंतवणूकदारांकडून २५ एप्रिलला १,३४० कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. अनेक आघाडीच्या दलाली पेढ्यांनी एथरच्या भागविक्रीत गुंतवणूकदारांना सहभागी होण्याची शिफारस करणारे अहवाल प्रसिद्ध केले आहेत. एथरचा महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे विद्युत दुचाकी निर्मितीचा प्रकल्प आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीने आयपीओच्या माध्यमातून ६,१४५ कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे. आता ओलानंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध होणारी एथर ही दुसरी विद्युत दुचाकी निर्माता कंपनी असेल.