पीटीआय, नवी दिल्ली
प्रदूषणविरहित ऊर्जा, शिक्षण व कौशल्ये, कृषिउद्योग आणि पर्यटन या विकासाच्या चार क्षेत्रांमध्ये भारताबरोबरचे व्यापारी आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ करणार असल्याचे ऑस्ट्रेलियाने बुधवारी जाहीर केले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिझ यांनी मेलबर्नच्या डीकिन विद्यापीठामध्ये ‘रोडमॅप ऑफ ऑस्ट्रेलियाज इकॉनॉमिक एंगेजमेंट विथ इंडिया’ जारी केला. त्यावेळी त्यांनी भारताबरोबर आर्थिक संबंध वाढवण्यात दोन्ही बाजूंचे हित असल्याची भूमिका मांडली.
भारताबरोबर आर्थिक संबंध वाढवण्यासाठी आताइतकी चांगली वेळ कोणतीच नाही असे अल्बानिझ म्हणाले. जागतिक पातळीवर भारत सध्या अवाढव्य देश आहे आणि त्याचे स्थान अधिकच उंचावत आहे अशी प्रशंसा त्यांनी केली. या दशकाच्या अखेरीस भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. भारताचा ही आर्थिक वाढ ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेला पूरक असल्याचे ते म्हणाले.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (ईसीटीए) झाल्यानंतर दोन वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने ही रणनीती जाहीर केली आहे. ही रणनीती भारताच्या आर्थिक वाढीतून निर्माण होणाऱ्या प्रचंड व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी हस्तगत करण्यासाठी मार्गदर्शक असल्याचे अल्बानिझ म्हणाले.भारताबरोबर व्यापार वाढल्यास जगात अनिश्चितता वाढत असताना ऑस्ट्रेलियाला आपल्याला पुरवठा साखळी सुरक्षित करण्यात मदत होईल. तसेच, नोकऱ्या निर्माण होतील असा विश्वास ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला.