नवी दिल्ली : सरलेल्या २०२४ मध्ये वाहन निर्मात्यांकडून देशात अडीच कोटींहून अधिक वाहनांची विक्री झाली. ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने दुचाकींच्या विक्रीत झालेली मोठी वाढ, एकूण वाहन विक्रीत वाढीस कारणीभूत ठरली. २०२३ च्या तुलनेत वाहन विक्रीत सुमारे १२ टक्क्यांची वाढ झाली, असे ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)’ संघटनेने मंगळवारी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> कॉसमॉस बँकेच्या अध्यक्षपदी प्रल्हाद कोकरे, उपाध्यक्षपदी यशवंत कासार
याबाबत सियामचे अध्यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले की, सरलेले वर्ष वाहन उद्योगासाठी चांगले राहिले. ग्राहकांकडून चांगली मागणी दिसून आल्याने प्रत्येक प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत वाढ नोंदविण्यात आली. गेल्या वर्षी एकूण २ कोटी ५८ लाख ९८ हजार ७६३ वाहनांची विक्री झाली. त्याआधी २०२३ मध्ये ही विक्री २ कोटी २८ लाख ३९ हजार १३० होती. वार्षिक तुलनेत सर्वाधिक १४.५ टक्के वाढ दुचाकींच्या विक्रीत झाली. एकूण १ कोटी ९५ लाख ४३ हजार ९३ दुचाकींची विक्री २०२४ मध्ये झाली.
हेही वाचा >>> नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
गेल्या वर्षी प्रवासी वाहने आणि तीनचाकी वाहनांची विक्री सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचली. प्रवासी वाहनांची विक्री ४३ लाख झाली असून, त्यात वार्षिक तुलनेत ४ टक्के वाढ नोंदविण्यात आली. याचवेळी ७.३ लाख तीनचाकी वाहने विकली गेली, त्यात ७ टक्के वाढ झाली आहे. वाणिज्य वाहनांच्या विक्रीत मात्र गेल्या वर्षी ३ टक्के घट नोंदविण्यात आली. २०२४ मध्ये एकूण ९.५ लाख वाणिज्य वाहनांची विक्री झाली, असे चंद्रा यांनी सांगितले.
सरकारकडून गेल्या वर्षी धोरणात सातत्य दिसून आले. त्याचा वाहन उद्योगाला फायदा झाला. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोच्या माध्यमातून नवीन वर्षाची सकारात्मक सुरूवात होत असून, त्यातून या वर्षात वाहन विक्रीला आणखी चालना मिळेल. – शैलेश चंद्रा, अध्यक्ष, सियाम