नवी दिल्ली : सरलेल्या जानेवारीमध्ये वाहन विक्रीमध्ये वार्षिक आधारावर ७ टक्क्यांची वाढ झाली असून सुमारे २२.९१ लाख वाहने विकली गेली, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन अर्थात ‘फाडा’ने गुरुवारी दिली. गेल्यावर्षी म्हणजेच जानेवारी २०२४ मध्ये एकूण किरकोळ विक्री २१.४९ लाख होती.
प्रवासी वाहनांपासून वाणिज्य वापराच्या प्रत्येक वाहन श्रेणीमध्ये सकारात्मक गती दिसून आली, जी वाहन बाजारपेठेत उत्साह परतत असल्याचे संकेत देते. गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत १६ टक्क्यांनी वाढ होऊन ती ४.६५ लाखांवर पोहोचली. अनेक वाहन वितरकांकडून मागणीत सुधारणा नोंदवली गेली. मात्र मोठ्या सवलतींमुळे वितरकांकडील जुनी वाहने विक्री करण्यास मदत झाली, असे ‘फाडा’चे अध्यक्ष सी. एस. विघ्नेश्वर म्हणाले. वितरकांकडील जमा वाहनांच्या (इन्व्हेंटरी) पातळीत लक्षणीय सुधारणा झाली आहे, ती सुमारे पाच दिवसांनी घसरून ५०-५५ दिवसांपर्यंत खाली आली आहे, ज्यामुळे पुरवठा-मागणी संतुलनात सुधारणा झाली आहे.
गेल्या महिन्यात दुचाकींची किरकोळ विक्री १५.२५ लाखांवर पोहोचली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात १४.६५ लाख दुचाकींवर मर्यादित होती. त्यात सुमारे ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. शहरी भागातील विक्री ग्रामीण भागाच्या तुलनेत अधिक राहिली आहे.
कंपन्यांकडून नवीन वाहनांचे सादरीकरण, लग्नाच्या हंगामातील मागणी आणि वाढलेला वित्तपुरवठा हे वाढीचे प्रमुख चालक ठरले असल्याचे विघ्नेश्वर म्हणाले. मात्र वाढत्या व्याजदरांबद्दल, ग्रामीण भागातील तरलतेसंबंधित आव्हाने आणि बाजारातील अनिश्चिततेबद्दल चिंता अजूनही कायम आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.
जानेवारीमध्ये वाणिज्य वाहनांची विक्री वार्षिक आधारावर ८ टक्क्यांनी वाढून ९९,४२५ वाहनांवर पोहोचली. तर ट्रॅक्टर विक्री वार्षिक आधारावर ५ टक्क्यांनी वाढून ९३,३८१ वर पोहोचली. तर गेल्या महिन्यात १.०७ लाख तीन चाकी वाहनांची विक्री झाली. त्यात सुमारे ७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. २०२५ च्या सुरुवातीच्या आशादायक गतीवर स्वार होऊन, फेब्रुवारीत सावध आशावादाने प्रवेश झाला असल्याचे ‘फाडा’ने नमूद केले.