नवी दिल्ली : Discount On New Car After Scrapping Old One जुने वाहन भंगारात काढल्यानंतर नवीन वाहनाच्या किमतीवर दीड ते तीन टक्के सवलत खरेदीदारांना देण्यास प्रवासी व वाणिज्य वाहनांच्या निर्मात्यांनी संमती दर्शविली आहे. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ही भूमिका कंपन्यांनी मंगळवारी जाहीर केली.
गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली वाहन निर्मात्यांची संघटना ‘सियाम’च्या शिष्टमंडळाची मंगळवारी बैठक झाली. यात वाहन उद्योगातील अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने जुने वाहन भंगारात काढल्यास नवीन वाहनावर सवलत देण्याचा मुद्दा उपस्थित झाला. कंपन्यांनी याला होकार दर्शविला आहे. भंगारात काढलेल्या जुन्या मोटारींचे तपशील ‘वाहन’ संकेतस्थळावर दिले जाणार आहे. कंपन्या ग्राहकांना अतिरिक्त सवलतही देऊ शकणार आहेत.
हेही वाचा >>> जिओ फायनान्शिअलला विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत नेण्यास मंजुरी
या बैठकीनंतर मर्सिडीज बेंझने जुनी मोटार भंगारात काढली असल्यास नवीन मोटारीच्या खरेदीवर सरसकट २५ हजार रुपये सवलत देण्याचे जाहीर केले आहे. याचबरोबर कंपनीकडून देण्यात येणाऱ्या इतर सवलतीही ग्राहकाला मिळतील. मारुती सुझुकी इंडिया, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, ह्युंदाई मोटार इंडिया, किया मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटार, होंडा कार्स, जेएसडब्ल्यू एमजी मोटार, रेनॉल्ट इंडिया, निस्सान इंडिया आणि स्कोडा फोक्सवॅगन या कंपन्यांकडून मोटारीच्या किमतीच्या १.५ टक्के अथवा २० हजार रुपये यातील कमी असलेली सवलत दिली जाणार आहे.
वाणिज्य वाहनांच्या निर्मात्यांनी दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही सवलत देण्याची तयारी दर्शविली आहे. याचबरोबर प्रवासी वाहन निर्मात्यांनी आगामी एक वर्षाच्या कालावधीसाठी अशी सवलत देण्याची तयारी दाखविली आहे. नवीन वाहनाच्या खरेदीवर सवलत मिळाल्यास अधिकाधिक ग्राहक त्यांच्या जुनी वाहने भंगारात काढतील, असा सरकारचा कयास आहे. यातून रस्त्यांवर सुरक्षित, कमी प्रदूषण करणारी आणि अधिक कार्यक्षम वाहने धावतील, असे सरकारचे म्हणणे आहे.
वाणिज्य वाहनांवर ३ टक्के सवलत
वाणिज्य वाहननिर्मिती कंपन्यांनी जुन्या भंगारात काढलेल्या वाहनाच्या बदल्यात नवीन वाहनाच्या खरेदीवर ३ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात टाटा मोटर्स, व्होल्व्हो, आयशर कमर्शियल व्हेईकल्स, अशोल लेलँड, महिंद्र अँड महिंद्र, फोर्स मोटर्स, इसुझू मोटर्स आणि एसएमएल इसुझू या कंपन्या ३.५ टन क्षमतेपेक्षा अधिकच्या वाहनांवर सवलत देतील. बस आणि व्हॅनवरही अशाच प्रकारची सवलत मिळणार आहे.