पीटीआय, नवी दिल्ली

मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, किआ इंडिया आणि होंडा यांसारख्या आघाडीच्या वाहन निर्मात्या कंपन्यांकडून वाहनांच्या किंमत वाढीच्या घोषणेनंतर संपूर्ण वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांकडून वाहनांच्या किमती आगामी महिन्यापासून वाढवण्यात येणार आहेत.

रेनॉ इंडियाने एप्रिलपासून २ टक्क्यांपर्यंत किंमती वाढवणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. वेगवेगळ्या श्रेणीतील वाहनांसाठी किंमतवाढीची व्याप्ती वेगवेगळी असेल, असे कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. फेब्रुवारी २०२३ नंतर रेनॉ इंडियाची ही पहिलीच किंमतवाढ आहे.

बीएमडब्ल्यूने देखील पुढील महिन्यापासून बीएमडब्ल्यू आणि मिनी कार श्रेणीतील वाहनांच्या किमती ३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना जाहीर केली आहे. वाहन उत्पादक कंपनीने या वर्षी केलेली ही दुसरी किंमत वाढ आहे. १ एप्रिल २०२५ पासून नवीन किमती लागू होतील, असे बीएमडब्ल्यू समूहाने म्हटले आहे. या वर्षी जानेवारीमध्येही अशीच किंमत वाढ करण्यात आली होती.