नवी दिल्ली : विमानाचे इंधन म्हणून प्रचलित एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये (एटीएफ) दर किलोलिटरमागे ५,८८३ रुपयांनी म्हणजेच ६.२९ टक्क्यांनी मंगळवारी कपात करण्यात आली. याबरोबरच वाणिज्य वापराच्या एलपीजीचे दर सिलिंडरमागे ४८.५ रुपयांनी वाढवण्यात आले.
कपातीनंतर विमानाच्या इंधनाचे दर हे आता वर्षभरातील नीचांकी पातळीवर ओसरले आहेत. मुंबईमध्ये हे दर किलोलिटरला ८७,४३२.७८ रुपयांवरून ८१,८६६.१३ रुपयांपर्यंत, तर दिल्लीत आता हे दर किलोलिटरला ८७,५९७.२२ रुपये झाले असल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी स्पष्ट केले. एका महिन्यात दुसऱ्यांदा किंमत कमी केल्याने विमान कंपन्यांचा भार हलका होण्यास मदत झाली आहे. विमान कंपन्यांचा परिचालन खर्चाच्या जवळपास ४० टक्के खर्च इंधनावर होतो.
हेही वाचा >>> वेणुगोपाल धूत , इतरांना एक कोटी भरण्याची ‘सेबी’ची नोटीस
सोबतच, तेल कंपन्यांनी वाणिज्य एलपीजीच्या किमतीत ४८.५ रुपयांनी वाढ केल्याने १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत १,७४० रुपये (दिल्ली) झाली आहे. ही सलग तिसरी मासिक वाढ आहे. मुंबईत वाणिज्य एलपीजीची किंमत आता प्रति सिलिंडर १,६९२.५० रुपये आहे. घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसचा दर मात्र ८०३ रुपये प्रति सिलिंडरवर कायम आहे.
विमान कंपन्यांचे समभाग तेजीत केंद्र सरकारने विमान इंधनाचे दर सलग दुसऱ्या महिन्यात कमी केल्याने इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो) आणि स्पाइसजेटचे समभाग मंगळवारच्या सत्रात पाच टक्क्यांनी वधारले. दिवसअखेर इंडिगोचा समभाग ११७.८० रुपयांनी वधारून ४,९०५.२५ रुपयांवर स्थिरावला. तर स्पाइसजेटचा समभाग ६.९५ टक्क्यांनी म्हणजेच ४.४३ रुपयांनी वधारून ६८.१३ रुपयांवर बंद झाला.