पीटीआय, नवी दिल्ली
विमानाचे इंधन म्हणून प्रचलित एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये (एटीएफ) दर किलोलिटरमागे १,४०१.३७ रुपयांनी म्हणजेच १.५ टक्क्यांनी बुधवारी कपात करण्यात आली. याबरोबरच वाणिज्य वापराच्या एलपीजीचे दर सिलिंडरमागे १४.५ रुपयांनी कमी करण्यात आले. कपातीनंतर विमानाच्या इंधनाचे दर मुंबईमध्ये दर किलोलिटरमागे ८५,८६१.०२ रुपयांवरून ८४,५११.९३ रुपयांपर्यंत, तर दिल्लीत आता हे दर किलोलिटरला ९०,४५५.४७ रुपये झाले असल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी स्पष्ट केले. विमान इंधनाचे दर कमी केल्याने विमान कंपन्यांचा भार हलका होण्यास मदत झाली आहे. विमान कंपन्यांचा परिचालन खर्चाच्या जवळपास ४० टक्के खर्च इंधनावर होतो.
गेल्या सलग दोन महिन्यांत विमान इंधनाच्या दरात वाढ झाली होती. १ नोव्हेंबर रोजी एटीएफच्या दरात ३.३ टक्के म्हणजेच दर किलोलिटरमागे २,९४१.५ रुपयांची वाढ झाली होती. तर १ डिसेंबर रोजी दर किलोलिटरमागे १,३१८.१२ (१.४५ टक्के) रुपयांनी वाढले होते. सोबतच, तेल कंपन्यांनी वाणिज्य एलपीजीच्या किमतीत १४.५ रुपयांनी वाढ केल्याने १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत आता १,८०४ रुपये (दिल्ली) झाली आहे. मुंबईत वाणिज्य एलपीजीची किंमत आता प्रति सिलिंडर १,७५६ रुपये आहे. सलग पाचव्यांदा दरवाढीने, वाणिज्य एलपीजीचे १९ किलोग्रॅमच्या सिलिंडर १७२.५ रुपयांनी महागले आहेत. घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसचा दर मात्र ८०३ रुपये प्रति सिलिंडरवर कायम आहे.
हेही वाचा : शेअर गुंतवणूकदारांच्या संख्येत सरलेल्या २०२४ मध्ये २७ टक्क्यांची वाढ
विमान कंपन्यांचे समभाग सकारात्मक
केंद्र सरकारने विमान इंधनाचे दर कमी केल्याने इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो) आणि स्पाइसजेटचे समभाग बुधवारच्या सत्रात वधारले. दिवसअखेर इंडिगोचा समभाग ४१.४५ रुपयांनी वधारून ४,५९५.७० रुपयांवर स्थिरावला. तर स्पाइसजेटचा समभाग १.८४ टक्क्यांनी वधारून ५६.४२ रुपयांवर बंद झाला.