जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्ष वाईट ठरण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाचे तीन आठवडेही उलटले नाहीत आणि गुगलच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे Google आणखी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या विचारात आहे, असेही संकेत मिळत आहे.
अंतर्गत मेमोमध्ये नोकर कपातीचे संकेत
द व्हर्जच्या रिपोर्टनुसार, Google ला येत्या काही दिवसांत पुन्हा नोकर कपातीचा सामना करावा लागू शकतो. सीईओ सुंदर पिचाई यांच्या अंतर्गत मेमोचा हवाला देत रिपोर्टमध्ये ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, पिचाई यांनी अंतर्गत मेमोमध्ये Google कर्मचार्यांना सक्त ताकीद दिली आहे. येत्या काही दिवसांत इतर लोकांनाही नोकर कपातीचा फटका बसू शकतो, असंही त्यांनी सांगितलं. गुगलने या वर्षी हजारो नोकऱ्या कमी केल्या आहेत.
अनेक मोठे निर्णय घ्यावे लागणार
पिचाई यांनी बुधवारी सर्व Google कर्मचार्यांना पाठवलेल्या अंतर्गत मेमोमध्ये म्हटले की, आमच्यासमोर काही उद्दिष्टे ही महत्त्वाकांक्षेला धरून आहेत. आम्ही यंदा आमच्या मोठ्या प्राधान्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणार आहोत. गुंतवणुकीची ही क्षमता असण्यासाठी आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. येत्या काही दिवसांत ज्या कठोर निर्णयाबद्दल बोलले जात आहे, तो प्रत्यक्षात नोकर कपातीशी संबंधित आहे, असंही पिचाई यांनी मेमोमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे.
पिचाई यांनी दिले ‘हे’ आश्वासन
गुगलच्या सीईओने असेही आश्वासन दिले आहे की, आगामी नोकर कपात गेल्या वर्षीइतकी व्यापक होणार नाही आणि प्रत्येक ग्रुपवर त्याचा परिणाम होणार नाही. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा नोकर कपात मोठ्या प्रमाणावर होणार नाही. यामध्ये प्रत्येक टीममधील कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार नाही. परंतु तुमचे सहकारी आणि टीम्सना नोकर कपातीमुळे प्रभावित झालेले पाहणे कठीण आहे, असंही पिचाई यांनी सांगितले.
गेल्या वर्षी १२ हजार नोकऱ्या गेल्या
गुगलने गेल्या वर्षी सुमारे १२ हजार लोकांना कामावरून काढून टाकले होते. त्या नोकरकपातीमध्ये हार्डवेअर, जाहिरात विक्री, सर्च, शॉपिंग, मॅप्स, पॉलिसी, कोअर अभियांत्रिकी आणि YouTube यासह सर्व टीम्स प्रभावित झाल्या. त्यानंतर यंदाही १० जानेवारीपासून अनेक विभागातील हजारो लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. आगामी नोकर कपातीमध्ये YouTube कर्मचार्यांना याचा सर्वात आधी फटका बसण्याचे संकेत मिळत आहेत. व्हिडीओ प्लॅटफॉर्मवरील सुमारे १०० जणांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचाः हवाई क्षेत्राला अच्छे दिन, आकासा एअरने दिले १५० बोईंग ७३७ मॅक्स विमानांच्या खरेदीचे आदेश
२०२२ पासून नोकर कपातीचा वेग कायम
टेक कंपन्या २०२२ पासून नोकर कपात करीत आहेत. गेल्या वर्षीही जगभरातील टेक कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. नव्या युगातील तंत्रज्ञान कंपन्यांशिवाय नोकर कपात करणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठ्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत नोकर कपात न करणाऱ्या अॅपलनेही पुनर्रचना करण्याचे संकेत दिले आहेत. Amazon च्या व्हिडीओ स्ट्रीमिंग कंपनी Twitch ने देखील यंदा सुमारे ५०० जणांना कामावरून काढून टाकले आहे.