पुणे : बजाज ऑटोकडून सीएनजी इंधनावरील दुचाकी विकसित करण्यात येत असून, येत्या जून महिन्यात ती बाजारपेठेत दाखल होईल, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी शुक्रवारी दिली. सीएनजी इंधनासाठी पेट्रोलपेक्षा कमी खर्च होत असल्याने ग्राहक या दुचाकीला पसंती देतील, असा विश्वास व्यक्त करून बजाज म्हणाले की, ग्राहकांकडून इंधन खर्चाचा प्रामुख्याने विचार केला जातो. मागील काही वर्षांतील तीनचाकी वाहनांच्या विक्रीचा विचार केला तर त्यात सीएनजी वाहनांची संख्या जास्त आहे.
हेही वाचा >>> महिनाअखेर दोन कंपन्यांचे आयपीओ खुले होणार; ब्लू पेबल’चा विस्तार योजनेसाठी १८.१४ कोटींचा आयपीओ
एकूण तीनचाकी विक्रीमध्ये सीएनजी वाहनांचे प्रमाण ६० टक्के आहे. त्यामुळे पेट्रोलपेक्षा कमी खर्चीक असलेल्या सीएनजी इंधनावरील दुचाकीकडे ग्राहक वळतील, अशी त्यांची अपेक्षा आहे. २० वर्षांपूर्वी दाखल झालेल्या बजाज पल्सर दुचाकी २० लाखांच्या विक्रीचा टप्पा लवकरच गाठला जाणार आहे. सीएनजी दुचाकीची नेमकी किंमत आणि इतर तांत्रिक तपशील जाहीर करण्यास मात्र बजाज यांनी नकार दिला. दरम्यान, सीएनजी दुचाकीची किंमत ही पेट्रोलवरील दुचाकीपेक्षा महाग असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या दुचाकीचा उत्पादन खर्च अधिक असणार आहे. तिला पेट्रोल आणि सीएनजी हे दोन्ही इंधन पर्याय देणारी विशेष टाकी वापरावी लागणार आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी हा पर्याय गरजेचा ठरणार आहे. सीएनजीवरील पहिली दुचाकी असल्याने तिच्याकडे वाहन उद्योगाचे लक्ष लागले आहे.