मुंबई: देशातील दूरसंचार क्षेत्रातील भारती एअरटेल कंपनीकडून आता बजाज फायनान्सची वित्तीय उत्पादने वितरित केली जाणार आहेत. उभय कंपन्यांनी सामंजस्य करारान्वये ही घोषणा सोमवारी केली.
एअरटेल सुरूवातीला उपयोजनाच्या (ॲप) माध्यमातून बजाज फायनान्सच्या उत्पादनांची सेवा ग्राहकांना देईल. नंतरच्या टप्प्यात एअरटेलच्या दालनांतून या उत्पादनांची सेवा दिली जाईल. बजाज फायनान्स ही देशातील सर्वांत मोठी बँकेतर वित्तीय कंपनी असून, तिला या भागीदारीमुळे एअरटेलच्या ३७ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचता येणार आहे. देशातील बँकेतर वित्तीय कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या डिसेंबरअखेरपर्यंत नऊ कोटी ७१ लाखांवर पोहोचली आहे.
हेही वाचा : विप्रोचा नफा २४ टक्के वाढीसह ३,३५४ कोटींवर
सध्या बजाज फायनान्सकडून एअरटेल थँक्स ॲपवर दोन वित्तीय उत्पादने सादर करण्यात आली आहेत. बजाज फायनान्सकडून मार्चपर्यंत उत्पादनांची संख्या चारवर नेली जाईल. त्यात सोने तारण कर्ज, व्यवसाय कर्ज, को-ब्रँडेड ईएमआय कार्ड आणि व्यक्तिगत कर्ज यांचा समावेश असेल. या वर्षात बजाज फायनान्सची एकूण १० उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे एअरटेलचे नियोजन आहे.
हेही वाचा : दोन वर्षांत १,००० कंपन्यांची ‘आयपीओ’साठी रीघ; तीन लाख कोटींची निधी उभारणी अपेक्षित
एअरटेलचे देशभरात १२ लाखाहून भक्कम वितरण जाळे आहे, तर पाच हजारांहून अधिक शाखा आणि ७०,००० विक्री प्रतिनिधी असलेल्या वैविध्यपूर्ण समूह बजाज फायनान्स यांचा एकत्रित वितरण प्रभाव या सामंजस्यामुळे लक्षणीय वाढणे अपेक्षित आहे.