मुंबई : बजाज हाउसिंग फायनान्सच्या समभागांनी सोमवारी दमदार सूचिबद्धतेनंतर, व्यवहार सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशीच दुपटीहून अधिक वाढ साधली. वर्षातील ‘आयपीओ’ बाजारातील सर्वोत्तम चौथ्या क्रमांकाच्या सूचिबद्धतेसह, कंपनीचे बाजार मूल्य १६ अब्ज डॉलरवर म्हणजेच, जवळपास तिप्पट झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बजाज हाउसिंग फायनान्सचा समभाग हा गेल्या आठवड्यात पार पडलेल्या ‘आयपीओ’ला मिळालेल्या विक्रमी प्रतिसादानंतर, सोमवारी बाजारात विधिवत सूचिबद्ध झाला. आयपीओमधून प्रत्येकी ७० रुपये किमतीला हा समभाग गुंतवणूकदारांनी मिळविला, तर सोमवारी प्रत्येकी १५० रुपयांवर म्हणजे ११४ टक्के अधिमूल्यासह त्यात व्यवहारास सुरुवात झाली. बाजारातील दिवसाचे व्यवहार आटोपले तेव्हा तो १३५.७ टक्क्यांच्या वाढीसह १६५ रुपयांवर हा समभाग स्थिरावला. यातून कंपनीचे बाजार भांडवल हे १.३७ लाख कोटी रुपये (१६.३३ अब्ज डॉलर) इतके झाले आहे. ६ अब्ज डॉलरचे बाजार भांडवल असणाऱ्या हुडको या देशातील गृहवित्त क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीला तिने यातून मागे टाकले आहे.

हेही वाचा : अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात भारत उद्दिष्टाच्या पुढे, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे प्रतिपादन

बजाज हाउसिंग फायनान्स समभागांचे धमाकेदार पदार्पणाचे या क्षेत्रातील स्पर्धक कंपन्यांमध्ये प्रतिकूल परिणाम दिसून आले. हुडकोचा समभाग सोमवारी दोन टक्क्यांनी घसरला, तर एलआयसी हाउसिंग फायनान्स ६ टक्के आणि पीएनबी हाउसिंग फायनान्सचा समभाग ६.६ टक्क्यांनी गडगडला.

हेही वाचा : कर्मचाऱ्यांपुढे ‘सेबी’चे अखेर नमते, प्रसिद्धी पत्रक मागे घेण्याचा नियामकांवर प्रसंग

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या बुधवारी (१२ सप्टेंबर) समाप्त झालेल्या आयपीओ आजवरच्या सर्व विक्रमांना मोडीत काढले आणि अलिकडच्या काळातील सर्वाधिक ६७.४३ पट अधिक भरणा मिळविला. . ६,५६० कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित असलेल्या या ‘आयपीओ’ने गुंतवणूकदारांकडून तब्बल ३.२० लाख कोटी रुपयांच्या बोली मिळविल्या. आधीचा विक्रम गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या ३,००० कोटी रुपयांच्या ‘आयपीओ’साठी आलेल्या सुमारे दीड लाख कोटींच्या बोली असा होता. एकाच वेळी पाच कंपन्यांचे, त्यातही पीएनजी ज्वेलर्स, टॉलिन्स टायर्स सारख्या ‘आयपीओ’शी स्पर्धा असतानाही, बजाज हाऊसिंग फायनान्सच्या समभागांनी गुंतवणूकदारांकडून मिळविलेली दमदार मागणी लक्षणीय ठरते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj housing finance shares rise 136 percent on debut fourth best performer of the year print eco news css