मुंबई : बाजार नियामक ‘सेबी’ने व्हिडिओकॉन समूहाचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांची बँक आणि डीमॅट खाती तसेच त्यांनी म्युच्युअल फंडांत धारण केलेल्या गुंतवणुकीवर टाच आणण्याचे आदेश सोमवारी सायंकाळी दिले. एकूण ५.१६ लाख रुपये दंड थकबाकीच्या वसुलीसाठी ही कारवाई केली गेली आहे.
सुप्रीम एनर्जी या कंपनीमधील स्वारस्याबद्दल वेळीच खुलासा न केल्यामुळे तसेच क्वालिटी टेक्नो ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि क्रेडेन्शियल फायनान्स लि. या हितंसंबंध जुळलेल्या कंपन्यांमध्ये केल्या गेलेल्या काही व्यवहारांच्या संदर्भात धूत यांनी नियमभंग केल्याचे सिद्ध झाल्यानंतर, सेबीने सरलेल्या मार्चमध्ये त्यांना ५ लाख रुपयांचा दंड भरण्याचा आदेश दिला होता. धूत आणि आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्यातील काही साटेलोटे व्यवस्थेबाबत मार्च २०१८ मध्ये प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर ‘सेबी’ने तपासणी सुरू केल्यानंतर हा कारवाईचा आदेश देण्यात आला आहे.
सोमवारी या संबंधाने काढल्या गेलेल्या नोटीशीत, ५ लाख रुपयांचा प्रारंभिक दंड, त्यावर १५,००० रुपये व्याज आणि १,००० रुपये वसुलीचा खर्च जमेस धरून एकूण थकबाकी ५.१६ लाख रुपये होत असल्याचे ‘सेबी’ने स्पष्ट केले. या थकीत दंड वसुलीसाठी, सेबीने सर्व बँका, सीडीएसएल आणि एनएसडीएल या डिपॉझिटरी आणि म्युच्युअल फंडांना धूत यांच्या खात्यातून कोणत्याही रक्कम, रोखे आणि म्युच्युअल फंड्स युनिट्सची गळती होऊ देऊ नये, असे फर्मावले आहे. तथापि, या खात्यांमध्ये नव्याने भर पडत असेल तर त्याला नियामकांनी परवानगी दिली आहे. बँकांना लॉकर्ससह त्यांची सर्व खाती गोठवण्याचे निर्देशही सेबीने दिले आहेत.