Tamilnad Mercantile Bank MD Resigns : तामिळनाड मर्कंटाइल बँक गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. आता या बँकेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ एस कृष्णन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी एका कॅब ड्रायव्हरच्या खात्यात बँकेने चुकून ९ हजार कोटी रुपये ट्रान्सफर केल्याने राजीनाम्याची बातमी समोर आली आहे. मात्र, राजीनाम्याची माहिती देताना एस कृष्णन यांनी वैयक्तिक कारणामुळे पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांच्या कार्यकाळाचा मोठा भाग अजून बाकी आहे.
हेही वाचाः आज बदलली नाही, तर २ हजार रुपयांची नोट जाणार रद्दीत; RBI ने स्पष्टच सांगितलं
बँकेने एमडीचा राजीनामा स्वीकारला
बिझनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तामिळनाड मर्कंटाइल बँकेने कृष्णन यांच्या राजीनाम्याची माहिती बाजार नियामकाला दिली आहे. याबरोबरच बँकेच्या संचालक मंडळाने २८ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत एमडीचा राजीनामाही स्वीकारला आहे. यानंतर रिझर्व्ह बँकेलाही ही माहिती देण्यात आली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनी हे पद स्वीकारले. रिझर्व्ह बँकेकडून मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त होईपर्यंत कृष्णन हे या पदावर कायम राहणार आहेत.
हेही वाचाः मारुती सुझुकीला जीएसटी प्राधिकरणाकडून १३९.३ कोटी रुपयांची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
कॅब ड्रायव्हरच्या खात्यात ९ हजार कोटी रुपये केले ट्रान्सफर
तामिळनाड मर्कंटाइल बँक चर्चेत आली, जेव्हा बँकेने चुकून एका कॅब ड्रायव्हरच्या खात्यात ९ हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले. चेन्नईचा कॅब चालक राजकुमार याचेही तामिळनाड मर्कंटाइल बँकेत खाते होते. कॅब ड्रायव्हरच्या खात्यात ९ हजार कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आला तेव्हा तो चक्रावून गेला. हा फेक मेसेज आहे, असे त्याला वाटले, पण त्याने २१ हजार रुपये त्याच्या मित्राच्या खात्यात ट्रान्सफर केल्यावर त्याला यश आले. अशा स्थितीत एवढी मोठी रक्कम प्रत्यक्षात आपल्या खात्यात जमा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले, मात्र अवघ्या अर्ध्या तासात बँकेने ती रक्कम खात्यातून काढून घेतली.