मुंबई: सामान्य ग्राहकांना बँकिंग सेवा विनासायास उपलब्ध व्हाव्यात म्हणून कार्यरत ‘बँक मित्रां’नी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तुटपुंजे मानधन, नियुक्ती पत्र, कोणत्याही सेवा-शर्तींचे संरक्षण नसलेल्या बँकिंग व्यवस्थेतील या महत्त्वाच्या घटकाने राज्यस्तरीय बँकर्स समितीला पत्र लिहून, त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
बँक मित्र सुरुवातीला प्रत्यक्ष बँकेशी करार करून त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करत असत, पण आता बँका कार्पोरेट एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीवर त्यांची नेमणूक करत आहेत. त्यांच्याकडून मिळणाऱ्या कमिशनमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. शिवाय बँक मित्रांना मिळणारे मानधन वेळेत मिळत नसून दर मनमानी पद्धतीने निश्चित असल्याने बँक मित्रांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा >>> हळदीचे १०० कोटी डॉलरचे निर्यातलक्ष्य
बँकांच्या शाखा नसलेल्या क्षेत्रात, बँक मित्र (बँकिंग करस्पॉन्डंट – बीसी) हा एक तृतीय-पक्ष मध्यस्थ म्हणून ग्राहकांना बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी नियुक्त केलेल्या बँकेसाठी काम करतो. खासगी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांद्वारे ‘बँक मित्रां’कडून जास्तीची कामे विनामोबदला करून घेतली जात असून, नियुक्ती पत्र, सेवाशर्तीचे पत्रही त्यांना दिले जात नाही. यामुळे प्रचंड असंतोष असलेल्या बँक मित्रांनी पुढाकार घेऊन ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन’शी (एआयबीईए) संलग्न संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय बँकर समितीला एका पत्राद्वारे हस्तक्षेपासाठी आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
संघटनेच्या वतीने सर्व जिल्हा प्रतिनिधींची पुण्यात फेब्रुवारी महिन्यात सभा घेण्यात येणार असून, ज्यात ‘बँक मित्रां’च्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात येईल आणि पुढील दिशा निश्चित करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष देवीदास तुळजापूरकर यांनी दिली.
राज्यात विस्तार किती?
सध्या महाराष्ट्रात २.४६ लाख बँक मित्र कार्यरत आहेत, ज्यातील २२ हजार हे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वतीने काम करतात. या बँक मित्रांनी ३.४६ कोटी जनधन खाती उघडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शिवाय त्यांनी बँकांच्या माध्यमातून जीवन ज्योती आणि जीवन सुरक्षा योजनेचे विमा कवच अनुक्रमे १.३८ कोटी आणि ३.१७ कोटी खातेदारांना उपलब्ध करून दिले. या बरोबरच त्यांनी १.३७ कोटी खातेदारांना अटल पेन्शन योजनेचे सभासद करून घेतले आहे.