पीटीआय, नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने कर्जाच्या व्याजदरात पाव टक्क्यांची (२५ आधार बिंदू) कपातीची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केल्यांनतर त्याचा लाभ ग्राहकांना त्वरित पोहोचवण्यासाठी बँकेने लगबगीने हे पाऊल टाकले.
बँकेने किरकोळ ग्राहक आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) कर्ज देण्यासाठी नवीन रेपो आधारित कर्जदर (ईबीएलआर) २५ आधारबिंदूंनी कमी केला आहे. दरम्यान, बँकेने निधी खर्चावर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) कोणताही बदल केलेला नाही. वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जासारख्या बहुतेक ग्राहक कर्जांसाठी वापरला जाणारा एक वर्षाचा कालावधीचा एमसीएलआर ९ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपातीचा निर्णय घेतल्यानंतर काही तासांतच सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांनी कपातीची घोषणा केली. ज्यामुळे विद्यमान ग्राहकांसह नवीन कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. नवीन ग्राहकांना गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज कमी दराने मिळविता येईल.
रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा व्याजदर कपात केल्याने बँकांनी देखील ग्राहकांना दर कपातीचा लाभ देऊ केला आहे. येत्या काही सत्रात इतर बँकांकडूनही लवकरच अशाच प्रकारच्या घोषणा होण्याची अपेक्षा आहे.