मुंबई: भारतात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीचा (एफपीआय) प्रवाह आगामी २०२५ मध्ये सकारात्मक राहण्याचा अंदाज असून, बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार ही आवक २० ते २५ अब्ज डॉलरच्या घरात जाणारी असेल. भारतीय भांडवली बाजारातून अलीकडच्या काळात परकीय गुंतवणूक वेगाने बाहेर पडत असली तरी अहवालाच्या मते, हा कल तात्पुरत्या स्वरूपाचा आहे आणि आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील देशाच्या मजबूत आर्थिक मूलभूत स्थितीमुळे परकीय गुंतवणुकीचा ओघ पुन्हा बहरलेला दिसून येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहवालात म्हटले आहे की, भारताची बाह्य तूट आणि वित्तीय तूटदेखील नियंत्रणात आहे, तर आर्थिक वाढीचा दर दमदार राहिला आहे. रिझर्व्ह बँकेने ६७५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त परकीय चलन राखीव गंगाजळी तयार केली आहे. जिला आवश्यकता भासल्यास देशांतर्गत चलनाला पाठबळ देण्यासाठी धोरणात्मकरीत्या तैनात केले जाऊ शकते.

हेही वाचा : प्रत्यक्ष कर संकलन उद्दिष्टापेक्षा अधिक होईल, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षांचा आशावाद

u

भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांमधून परदेशी गुंतवणूकदारांकडून अलीकडेच दिसून आलेली भांडवलाची माघार ही प्रतिकूल जागतिक घडामोडींवरील प्रतिक्रिया या स्वरूपाची आहे. या प्रतिकूल घटकांमध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या चक्राभोवती असलेल्या अपेक्षांबाबत अनिश्चितता आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडीनंतर निर्माण झालेल्या राजकीय अनिश्चिततेचा समावेश आहे. मात्र अमेरिकेत वित्तीय आणि पतविषयक धोरणांसंबंधाने स्पष्टतेनंतर आता माघारी जात असलेला पैसा पुन्हा परतेल, असा अहवालाने विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा : Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण! खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील आजचा दर

भारताची जीडीपी वाढ ७ टक्क्यांच्या वर राहणे अपेक्षित आहे, ज्यामुळे ती जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. मजबूत आर्थिक विकासाच्या शक्यता लक्षात घेता भारत हे विदेशी गुंतवणूकदारांसाठी पसंतीचे ठिकाण आहे. अधिक परतावा मिळवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी, अहवालात म्हटले आहे की भारतासारखी उदयोन्मुख बाजारपेठच दीर्घकालीन आकर्षक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank of baroda report foreign investment of 25 billion dollars return to indian stock market in a year print eco news css