लंडन, पीटीआय
ब्रिटनची मध्यवर्ती बँक असेलल्या बँक ऑफ इंग्लडने महागाई विरोधात आक्रमक पाऊल टाकत व्याजदरात २५ आधार बिंदूंची वाढ केली आहे. जागतिक पातळीवर वित्तीय व्यवस्थेतील अडचणींमुळे संभवणाऱ्या आर्थिक परिणामांबद्दल चिंता व्यक्त करतानाच, तिने गुरुवारी सलग ११ वी व्याजदर वाढीची घोषणा करत महागाईशी लढण्यावर लक्ष केंद्रित केले.
व्याजदरात झालेल्या ताज्या पाव टक्क्यांच्या वाढीने ते आता ४.२५ टक्क्यांवर गेले आहेत. अन्नधान्य, कपडे आणि जेवणावरील खर्च वाढल्यामुळे सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात महागाईचा दर १०.४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मध्यवर्ती बँकेने गुरुवारी केलेली ताजी व्याजदर वाढ ही मे २०२२ नंतरची सर्वात कमी वाढ आहे. कारण बँक ऑफ इंग्लंडने विद्यमान वर्षाच्या शेवटी महागाई २.९ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.