देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने ७.८८ टक्के कूपन दराने टियर II बाँडच्या विक्रीतून २ हजार कोटी रुपये उभे केले आहेत.
ऑफरपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला
विशेष म्हणजे ही रक्कम NSE च्या इलेक्ट्रॉनिक बिडिंग प्लॅटफॉर्मवर उभारण्यात आली आहे. २००० कोटी रुपयांच्या ऑफरच्या तुलनेत तिला ३७७० कोटी रुपयांच्या ८३ बोली मिळाल्या आहेत, असंही बँकेनं सांगितलं आहे.
हा पैसा बँक कुठे वापरणार?
या निधीचा वापर बँकेचे एकूण भांडवल वाढवण्यासाठी आणि रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दीर्घकालीन संसाधने वाढवण्यासाठी केला जाणार आहे. ही रक्कम कोणत्याही विशिष्ट प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी वापरली जाणार नाही, असंही बँकेनं स्पष्ट केलंय.
बँक समभाग आज जवळपास ६ टक्क्यांनी वाढले
काल बँक ऑफ इंडियाचे शेअर्स NSE वर ५.९० रुपयांनी म्हणजेच ५.९९ टक्क्यांनी वाढून १०४.३५ रुपयांवर पोहोचले होते. जर आपण एकूण बँक निफ्टीबद्दल बोलायचे झाल्यास आज बँक निफ्टी ३९८ अंकांनी वाढून ४५,९०९ वर बंद झाला होता.
हेही वाचाः गरिबांना ७५ लाख नवीन मोफत एलपीजी कनेक्शन मंजूर; मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
पहिल्या तिमाहीत नफा झाला
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या म्हणजेच जून तिमाहीच्या निकालांनुसार, BOI चा निव्वळ नफा जवळपास तीन पटीने वाढून १,५५१ कोटी रुपये झाला आहे. बँकेने यामागे बुडीत कर्जे (NPA) कमी झाल्याचे कारण सांगितले होते. निकाल जाहीर करताना बँकेने सांगितले होते की, गेल्या वर्षी याच कालावधीत ५६१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून १५,८२१ कोटी झाले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत ११,१२४ कोटी होते.