सरकारी मालकीच्या बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या ग्राहकांना सणासुदीच्या आधी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. बँकेने मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने FD वरील व्याजदरात १२५ बेसिस पॉइंट्स म्हणजेच १.२५ टक्के वाढ केली आहे. हे नवीन दर १२ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.
हे दर FD आणि विशेष योजनांवर लागू होणार
BOM ने म्हटले आहे की, नवे व्याजदर FD वर तसेच बँकेने ठरवलेल्या कालावधीनुसार विशेष योजनांवर लागू होणार आहेत. बँकेने म्हटले आहे की, वाढीव नव्या व्याजदरामुळे व्यक्ती आणि व्यवसायांना अधिक बचत करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. बँकेने ४६-९० दिवसांच्या कालावधीसाठी FD दर १२५ bps ने वाढवला आहे.
हेही वाचाः आरबीआयनं २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत वाढवली नाही, आता ‘या’ नोटांचे काय होणार?
आता तुम्हाला किती व्याज मिळणार?
नवीन व्याजदरानुसार, १ वर्षाच्या कालावधीसाठी ६.५० टक्के व्याज असेल आणि एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या ठेवींवर ग्राहकांना २५ bps ची वाढ म्हणजेच ६.२५ टक्के व्याज मिळेल. BOM ने सांगितले की, २००/४०० दिवसांच्या विशेष योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ७.५ टक्क्यांपर्यंत आकर्षक ठेव दर मिळू शकतो, जो सामान्य नागरिकांच्या तुलनेत ५० bps चा अतिरिक्त लाभ आहे. बँकेचे आकर्षक व्याजदर शॉर्ट टर्म आणि दीर्घकालीन बचत करणार्यांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतात.