सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र अर्थात महाबँकेने नफा आणि कर्ज वितरणाच्या आघाडीवर सरकारी बँकांमध्ये सर्वोच्च कामगिरी केली आहे. बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये निवळ नफ्यात १२६ टक्क्यांची भरीव कामगिरी करत २,६०२ कोटींचा निव्वळ नफा मिळविला आहे. तर सरकारी क्षेत्रातील १२ बँकांनी सरलेल्या वर्षात निव्वळ नफ्यात ५७ टक्के वाढीची कामगिरी केली आहे. वर्षभरात या सर्व बँकांनी १,०४,६४९ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे.
महा बँकेकडून होणाऱ्या कर्जवितरणात २९.४ टक्क्यांची वाढ झाली असून बँकेने मार्च २०२३ अखेर १,७५,१२० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर त्यापाठोपाठ इंडियन ओव्हरसीज बँक आणि यूको बँकेने अनुक्रमे २१.२ टक्के आणि २०.६ टक्क्यांनी वाढ साधली आहे. मात्र देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने २७,७६,८०२ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. जे महाबँकेच्या सुमारे १६ पट अधिक आहे.
हेही वाचाः थेट परकीय गुंतवणुकीला दशकात पहिल्यांदाच ओहोटी, १६ टक्क्यांनी घसरून ७१ अब्ज डॉलरवर सीमित
ठेवींमध्ये भरीव वाढ
ठेवींच्या आघाडीवर महाबँकेतील ठेवी १५.७ टक्क्यांनी वाढून २,३४,०८३ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. त्यापाठोपाठ बँक ऑफ बडोदाच्या ठेवींमध्ये १३ टक्के वाढ झाली असून त्या १०,४७,३७५ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. तर पंजाब नॅशनल बँकेच्या ठेवी १२,५१,७०८ कोटींवर पोहोचल्या असून त्यात ११.२६ टक्के वाढ झाली आहे. बँकेच्या कासा म्हणजेच बचत आणि चालू खात्यांतील ठेवींमध्ये ५३.३८ टक्क्यांची वाढ झाली आहे. याप्रकारच्या ठेवींमध्ये ५०.१८ टक्क्यांसह सेंट्रल बँक ऑफ इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचाः एलआयसीचा तिमाही नफा वाढून १३,१९१ कोटी झाल्यानंतर शेअर्समध्येही उसळी
महाबँकेची एकूण व्यावसायिक उलाढाल मार्च २०२३ अखेरीस २१.१ टक्क्यांनी वाढून ४,०९,२०२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यानंतर बँक ऑफ बडोदाची उलाढाल १४.३ टक्क्यांची वाढली आहे. ती आता १८,४२,९३५ कोटींवर पोहोचली आहे. तसेच किरकोळ-कृषी-एमएसएमई (आरएएम) कर्जाच्या बाबतीत, महाबँकेने वार्षिक आधारावर २४.०६ टक्के अशी सर्वाधिक वाढ नोंदवली.
मजबूत कामगिरीत सातत्य राहील – एस ॲण्ड पी
भारतातील बँकांनी यंदा दशकातील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आणि सुदृढ नफावाढ आणि पतगुणवत्तेत सुधारणेच्या या कामगिरीत यापुढेही सातत्य राहील, असा विश्वास जागतिक पतमानांकन संस्थ एस ॲण्ड पी ग्लोबल रेटिंग्जने गुरुवारी व्यक्त केला. या संस्थेच्या विश्लेषक दीपाली सेठ छाब्रिया म्हणाल्या, मुख्यतः बुडीत कर्जाच्या समस्येने त्रस्त सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून दमदार वसुली केली गेली आणि विशेष म्हणजे निर्लेखित केलेल्या खात्यांमधून झालेल्या चांगल्या वसुलीचा त्यांच्या नफ्यावर दृश्य परिणाम दिसून येत आहे.