भारतात बँकिंग क्षेत्राला उगाचच अवास्तव महत्त्व दिलं आहे, त्यामुळे लहान कंपन्या दुर्लक्षित राहिल्या आहेत, असं मोबियस कॅपिटल पार्टनर्स एलएलपीचे संस्थापक मार्क मोबियस यांनी सांगितलं आहे. मार्क मोबियस हे प्रामुख्याने जागतिक बाजारातील अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक करतात. १ जून रोजी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारतात निर्देशांकांमध्ये बँकिंग क्षेत्रातील शेअर्सचे सर्वाधिक वजन आहे. परंतु अलिकडच्या वर्षांत त्यांची कामगिरी डळमळीत झाली आहे, कारण त्यांनी अनेकदा गुंतवणूकदारांची निराशा केली आहे, असंही त्यांनी अधोरेखित केले आहे.
मोबियस यांची भारतात पर्सिस्टंट सिस्टीम्स आणि अपोलो हॉस्पिटल्ससह एकूण ४ शेअर्समध्ये गुंतवणूक आहे. जेव्हा मार्क २०१७ मध्ये IEC मध्ये सहभागी होण्यासाठी आले, तेव्हा त्यांची भारतात फक्त एक गुंतवणूक होती. ती संख्या आता ४ वर गेली आहे. जोपर्यंत त्यांचे शेअर्स वाढत नाही, तोपर्यंत ते ठेवण्याची त्यांची योजना आहे. भारतात प्रचंड क्षमता आहे, त्यामुळे गुंतवणूक वाढत आहे, असंही ते म्हणालेत.
नॉन इंडेक्स कंपन्यांना (त्या प्रमुख निर्देशांकांचा भाग नसलेल्या) उत्तम संधी असल्याचंही मोबियस सांगतात. भारतीय बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास ते इतर बाजारांच्या तुलनेत वेगळे आहेत. त्यांच्याकडे भांडवलावर परतावा किंवा जास्त गुंतवणुकीवर २० टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या कंपन्यांची संख्या जास्त आहे. आम्ही इतर देशांमध्येही तसा फायदा शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण ते शोधणे फार कठीण आहे. त्यामुळे भारताबाबत ही एक मोठी गोष्ट आहे आणि ती अर्थातच अर्थव्यवस्थेला प्रतिबिंबित करते. देश वेगाने विकसित होत आहे ही वस्तुस्थिती असल्याचंही ते म्हणालेत.
२०२२-२३ मध्ये वास्तविक GDP मधील वाढ २०२१-२२ मधील ९.१ टक्क्यांच्या तुलनेत ७.२ टक्के आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२३ साठी वास्तविक GDP वाढीचा दर ६.८ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये वाढीचा दर सर्वाधिक आहे. सध्या तंत्रज्ञान क्षेत्रामध्येही भारताला विशेष संधी आहे. भारताने सॉफ्टवेअरमध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु हार्डवेअरला पुढे घेऊन जाणे हे भारतासाठी अतिशय गंभीर आणि अत्यंत महत्त्वाचे असणार आहे,” म्हणून सेमीकंडक्टर्स आणि सेमीकंडक्टरशी संबंधित व्यवसाय भारतात अधिकाधिक वेगाने वाढणे आवश्यक आहे. भारतात पुढील चार ते पाच वर्षांत सेन्सेक्स १,००,००० पर्यंत वाढू शकतो. १,००,००० पातळी गाठण्यासाठी सेन्सेक्सला दरवर्षी १०-१३ टक्क्यांच्या श्रेणीत वाढ करावी लागेल. गेल्या २३ वर्षांत निर्देशांक ११.५ टक्के CAGR प्रमाणे ५००० वरून ६२००० पर्यंत वाढला आहे. एखादा देश ७ टक्के दराने वाढत असेल, तर तुम्ही चांगल्या कंपन्यांचा विकास दर दुप्पट म्हणजेच १४ टक्क्यांच्या दराने वाढण्याची अपेक्षा करू शकता. त्यामुळे बाजाराच्या आकारमानात आणि बाजारपेठेतील प्रत्यक्ष गुंतवणुकीत तुम्हाला ही वाढ मिळण्याची शक्यता आहे, असंही मोबियस यांनी सांगितलं आहे.
हेही वाचाः एलॉन मस्क श्रीमंतांच्या यादीत पुन्हा पहिल्या स्थानावर, जाणून घ्या गौतम अदाणी कोणत्या स्थानी?