मुंबई : बँकांकडून जास्तीत जास्त ठेवी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. यामुळे येत्या काळात त्यांना ठेवींवरील व्याज दरात वाढ करणे भाग ठरेल, असा रिझर्व्ह बँकेच्या मासिक पत्रिकेने अंदाज व्यक्त केला आहे. बँकांनी त्यांच्याकडील निधी वाढवण्यासाठी ठेवींवरील व्याज दरात मागील काही महिन्यांपासून वाढ करण्यास सुरुवात केली आहे.
ठेवींचे प्रमाण वाढवण्यासाठी बँकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे ठेवींवरील व्याज दरात आगामी काळात आणखी वाढ होणार आहे. बँकांकडील मुदत ठेवींमध्ये १३.२ टक्के वाढ झाली असून, चालू आणि बचत खात्यावरील ठेवींमध्ये अनुक्रमे ४.६ टक्के आणि ७.३ टक्के वाढ झाली आहे. मुदत ठेवींवरील परतावा वाढला असतानाच बचत खात्यातील ठेवींवरील व्याजदरही वाढले आहेत.
बँकांच्या ठेवींमध्ये मुदत ठेवींचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे, असे पत्रिकेत म्हटले आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये ठेवींचा ओघ वाढवण्यासाठी चढाओढ लागल्याचे प्रत्यक्षात चित्रही दिसून येते. नुकताच सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात ०.२५ टक्का वाढ केली. याच वेळी डॉईश बँक या परदेशी बँकेकडून तीन वर्षे मुदतीच्या ठेवीवर ७.५० टक्के व्याज दिले जात आहे.
भारताच्या विकासाचा वेग कायम
करोना संकटकाळात भारताची प्रगती अपेक्षित अंदाजापेक्षा अधिक राहिल्याचे दिसले आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने वेग घेतला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेप्रमाणे भारताच्या विकासाचा वेग मंदावणार नाही. चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सुरूच राहील, असा विश्वास रिझर्व्ह बँकेच्या मासिक पत्रिकेने व्यक्त केला आहे.