भारतात बेरोजगारीचा प्रश्न आ वासून उभा असून त्यावर तातडीने उपाययोजना करणं आवश्यक असल्याची बाब विरोधी पक्ष सातत्याने अधोरेखित करत आहेत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक देशांमध्ये बेरोजगारीचा मुद्दा मांडला जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे रोजगार शोधणाऱ्यांची चिंता कमी होत नसताना आता रोजगार देणाऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बीसीजी अर्थात Boston Consulting Group कडून करण्यात आलेल्या ताज्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष नुकतेच जाहीर झाले असून तब्बल २८ टक्के कर्मचारी येत्या वर्षभरात नोकरी सोडण्याच्या विचारात असल्याचा दावा या निष्कर्षांमध्ये करण्यात आला आहे.
नेमका काय आहे निष्कर्ष?
BCG नं मांडलेल्या निष्कर्षानुसार, एकूण २८ टक्के कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सध्याच्या कंपनीत कायम राहण्यास इच्छुक नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना नेमकं काय हवं आहे, त्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचं या अहवालात नमूद केलं आहे.
भारतात काय परिस्थिती?
जगभरातल्या एकूण आठ देशांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. एकीकडे जागतिक पातळीवर नोकरी सोडण्याच्या विचारात असलेल्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण २८ टक्के असताना भारतात हे प्रमाण २६ टक्के इतकं आहे. अर्थात देशातील कंपन्यांमधील २६ टक्के कर्मचारी येत्या वर्षभरात कंपनी बदलू शकतात. “कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार, कामाचे तास, कामाच्या ठिकाणी मान, न्याय्य वागणूक, चांगल्या कामाची दखल अशा त्यांच्या भावनिक स्वास्थ्याशी संबंधित गोष्टी यांचा योग्य तो समतोल साधण्याची गरज आहे”, अशी प्रतिक्रिया बीसीजी इंडियाच्या एमडी नीतू चितकरा यांनी दिल्याचं फायनान्शिअल एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
दिवाळखोर ‘गो फर्स्ट’च्या खरेदीसाठी स्पाइसजेट इच्छुक
कसा केला हा सर्व्हे?
जगभरातल्या एकूण ८ देशांमध्ये ६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये हा सर्व्हे पार पडला. या आठ देशांमध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान व भारत या देशांचा समावेश आहे. या सर्व्हेसाठी बीसीजीनं २० प्रकारच्या मुद्द्यांवर प्रामुख्याने प्रश्न विचारले होते. यामधले निम्मे हे प्रत्यक्ष कामाशी निगडित होते तर उर्वरीत प्रश्न हे कर्मचाऱ्यांच्या भावनिक स्वास्थ्याशी संबंधित होते.
कर्मचाऱ्यांना कोणत्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या वाटतात?
दरम्यान, कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या ठरलेल्या अशा पाच गोष्टी या सर्वेक्षणातून समोर आल्या आहेत. त्यानुसार पगार व कामाचे तास या दोन बाबी पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मात्र, कामाच्या ठिकाणी चांगली वागणूक मिळण्याला कर्मचाऱ्यांनी तिसऱ्या क्रमांकाचं प्राधान्य दिलं आहे. त्याशिवाय रोजगाराची सुरक्षितता कर्मचाऱ्यांसाठी चौथ्या क्रमांकाची सर्वात महत्त्वाची बाब ठरली असून पाचव्या क्रमांकावर ज्या कामात आनंद मिळतो, असं काम करायला मिळण्याचा मुद्दा कर्मचाऱ्यांनी निवडला आहे.