मुंबईः समाजातील विविध स्तरांमध्ये नवउद्यमींची (स्टार्टअप) लाट सुरू आहे. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (डिक्की) सर्व उदयोन्मुख दलित उद्योजक आणि नवउद्यमींना मार्गदर्शन आणि समर्थन देण्यासाठी ‘बीइंग सक्सेसफुल आंत्रप्रीन्योर’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

या उपक्रमाने नुकतेच चेंबूर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये प्रमुख उद्योजक आणि तज्ज्ञांनी हजेरी लावली.

बीइंग सक्सेसफुल आंत्रप्रीन्योरचे मुख्याधिकारी अरुण धनेश्वर म्हणाले, यशस्वी उद्योजकांच्या अनुभवातून नवीन दलित उद्योजकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. यशस्वी उद्योजकांच्या कथा, त्यांचे संघर्ष आणि त्यांची यशोगाथा आम्हाला लोकांसमोर आणायची आहे. डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे म्हणाले, असे अनेक लहान आणि मध्यम उद्योजक आहेत ज्यांना आवश्यक मार्गदर्शनाची गरज आहे आणि त्यांना व्यावसायिक जगात समान स्थान हवे आहे. त्यांच्यासाठी आदर्श व वस्तुपाठ ठरेल अशा आपल्याच यशोगाथांवर प्रकाशझोत पडायलाच हवा. या कार्यक्रमात १३ यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांमध्ये तन्वी इंजिनीअरिंग कॉर्पोरेशनचे सुनील शिंदे, बिझ क्राफ्ट सोल्युशन्सचे संतोष कांबळे, सुपर्ब ग्रुपचे सुजात वाघमारे आणि इतरांचा समावेश होता.

वॉर्डविझार्डची राज्यात विद्युत तीनचाकींसाठी भागीदारी

मुंबईः विद्युतशक्तीवरील वाहनांची (ईव्ही) उत्पादक वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेडने महाराष्ट्रात स्पीडफोर्सईव्ही आणि कॅबीज या ऑनलाइन प्रवासी सेवा क्षेत्रातील कंपन्यांशी भागीदारीत एल५ ही २०० विद्युत तीन-चाकी वाहने पुरविणार आहे. याद्वारे ऑटो चालकांना उत्पन्नाच्या जास्त संधी मिळवून देण्यासह, ग्राहकांना वाहतुकीचा वाजवी पर्याय आणि त्यांचा दैनंदिन प्रवास वेगवान बनविण्याचे उद्दिष्ट आहे, असे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यतीन गुप्ते म्हणाले. या आधी स्पीडफोर्ससह भागीदारीत हैद्राबादमध्ये १०० ई-दुचाकी यशस्वीपणे कार्यरत केल्यानंतर, कंपनीकडून आता कोलकाता, पुणे व अहमदाबाद येथे ४०० ई-दुचाकी सेवेत आणल्या जाणार आहेत.