नवी दिल्ली, वृत्तसंस्था
वॉरेन बफे यांच्या नेतृत्वाखालील बर्कशायर हॅथवेने सरलेल्या जून तिमाहीत एकूण मालमत्तेच्या तुलनेत रोखीची स्थिती म्हणजेच कंपनीकडील रोखता २५ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. याआधी २००५ मध्ये त्यांनी रोखता या पातळीपर्यंत वाढवली होती.
बर्कशायर हॅथवेने अलीकडेच ॲपल आणि बँक ऑफ अमेरिकामधील समभाग विकून हिस्सेदारी घटवली आहे. परिणामी बर्कशायरचे रोख आणि रोख समतुल्य धारणेने जूनच्या अखेरीस विक्रमी २७६.९ अब्ज डॉलरची पातळी गाठली. बर्कशायरने आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी ॲपलमधील आपली हिस्सेदारी जवळपास ५० टक्क्यांनी कमी केली आणि जुलैपासून बँक ऑफ अमेरिकामधील हिस्सेदारी ८.८ टक्क्यांनी कमी केली आहे.
हेही वाचा >>>स्टेट बँकेकडून १.४१ लाख कोटींची कर्जे निर्लेखित; आठ वर्षांत बड्या थकबाकीदारांकडून केवळ १२ टक्के वसुली
मे महिन्यात पार पडलेल्या, बर्कशायरच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीदरम्यान बफे म्हणाले होते की, त्यांना अधिक समभाग खरेदी करण्याची कोणतीही घाई नाही. मात्र बर्कशायरच्या जून तिमाहीतील शेअरधारणेमध्ये सौंदर्यप्रसाधन विक्री दालन शृंखला अल्ट्रा ब्युटी आणि एरोस्पेस कंपनी हेइको यामधील अल्प भागीदारी नव्याने केली आहे.
नेमका संकेत काय?
बफे यांनी रोख धारणा वाढवणे उत्सुकतेचा विषय ठरला आहे. समाजमाध्यम ‘एक्स’च्या माध्यमातून त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. अमेरिका मंदीचे वळण घेत आहे का, ज्यामुळे बर्कशायरचा रोख धारणेचा हिस्सा केवळ दोन वर्षांत दुप्पट झाला आहे. अमेरिकी रोजगार निर्देशकांच्या माध्यमातून तेथे मंदीचा धोका दर्शवला जात आहे काय? असे प्रश्न यातून पुढे केले जात आहेत.